आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांना हार घालताना चपला न काढणा-या योगींनी आम्हाला शिकवू नये- उद्धव ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत त्यांच्या हयातीत खंजीर खुपसले त्याच हातांना तुम्ही ‘मेहंदी’ लावून नवरदेव बनवलेत ना? त्यामुळे घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत. खंजीर उलटू शकतो हे ध्यानात ठेवा. अफझलखानाचा कोथळा असाच निघाला होता. अफझलखानाने शिवरायांच्या पाठीत   खंजीर खुपसला. शिवरायांनी सरळ समोरून खानाचा कोथळाच काढला. ज्यांना शिवरायांना हार घालण्याआधी पायातल्या चपला काढता येत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

 

उद्धव ठाकरे यांनी 'सामना'त अग्रलेख लिहून, भाजपच्या ढोंगीपणावर हल्ला केला आहे. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे अग्रलेखात....

 

- उत्तर प्रदेशचे ढोंगी मुख्यमंत्री पालघरात प्रचारास आले व तोफांतून पिचकाऱ्या मारून गेले. काय, तर म्हणे शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब असते तर असे घडले नसते, अशा पिचकाऱ्या सोडणाऱ्यांना इतिहास किंवा छत्रपती समजलेच नाहीत. 

 

- एखाद्या बेफाम माथेफिरू खुन्याप्रमाणे भाजप सध्या दिसेल त्याच्या पाठीत खंजीर खुपसत आहे व त्याबाबतची वृत्ते रोजच प्रसिद्ध होत आहेत. पालघरात शंभर नंबरी काँगेसवाल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी देणे व त्यांच्या प्रचारासाठी येऊन शिवसेनेवर आग्यावेताळाप्रमाणे बोलणे यास पाठीत खंजीर खुपसणे नाही म्हणावे तर काय म्हणावे? 

 

- कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा स्वतः भाजपने एकवेळ लढवली असती तरी आम्ही समजू शकलो असतो, पण शिवसेनेच्या विरोधात या जागेचा अफझलखानी नजराणा ज्यांना बहाल केला तो काय म्हणून घ्यायचा? ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत त्यांच्या हयातीत खंजीर खुपसले त्याच हातांना तुम्ही ‘मेहंदी’ लावून नवरदेव बनवलेत ना? त्यामुळे घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत.

 

- नाशिक, परभणी शिवसेनेने जिंकले ही सुरुवात आहे. पालघरचा विजय हा ट्रेलर असेल. त्यानंतरची घोडदौड महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल. इतर पक्षांतील माणसे भाडय़ाने घेता येतात. राजकारणात सर्वत्र स्वार्थाचा मायाबाजार भरला आहे. शिवसेनेचा भगवा झेंडा सगळ्यांहून वेगळा आहे. 

 

- योगी आदित्यनाथांसारखे लोक महाराष्ट्रात येऊन प्रवचने झोडतात. मरगट्टय़ांना ‘छत्रपती’ काय ते शिकवतात व पायात खडावारूपी चपला घालून शिवरायांना पुष्पमाला चढवतात. यावर भाजपचे काय म्हणणे आहे? शिवरायांचा हा अपमान पाहून थडग्यातला अफझलखानही आनंदाने नाचत असेल. भाजप महाराष्ट्रात धोतऱ्याच्या बिया पेरत आहे.

 

- महाराष्ट्र सचोटी व प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. भाजप त्यास सुरुंग लावत आहे. कोकण-नाशकात राष्ट्रवादीस त्या पक्षाने खुला पाठिंबा दिला. हा कुणाच्या पाठीत खंजीर होता? खंजीर उलटू शकतो हे ध्यानात ठेवा. अफझलखानाचा कोथळा असाच निघाला होता. अफझलखानाने शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवरायांनी सरळ समोरून खानाचा कोथळाच काढला. ज्यांना शिवरायांना हार घालण्याआधी पायातल्या चपला काढता येत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची!

बातम्या आणखी आहेत...