आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाखालची वाळू सरकली की पाकड्यांची जपमाळ ओढणे हा नापाकपणा, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पाकड्यांचा हात व जीभ वळवळत असेल तर फक्त प्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी. पायाखालची वाळू सरकली की पाकिस्‍तान व दाऊदची जपमाळ ओढायची हा नापाकपणाच. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर टीका केली आहे.


अहमद पटेल यांचे नाव समोर करुन मोदी हिंदु-मुसलमान कार्ड खेळत आहे का?
गुजरात निवडणुकीत पाकिस्‍तान काँग्रेसच्‍या मदतीने आपल्‍याविरोधात कटकारस्‍थान रचत असल्‍याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्‍ये केला आहे. त्‍यावरुन उद्धव ठाकरे यांनी 'पंतप्रधानांनी आरोप करायचे नसतात, कृती करायची असते', असे सुनावले आहे. सामनातील अग्रलेखात उद्धव म्‍हणाले, 'पालनपूर येथील एका सभेत मोदी यांनी ठिणगी टाकली की, पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. मोदींचा हा सवाल शतप्रतिशत योग्‍य आहे. हिंदुस्थानच्या एखाद्या राज्यात कोणी मुख्यमंत्री व्हायचे व कोणी नाही हा चोंबडेपणा करण्याचा अधिकार पाकड्यांना कोणी दिला? मात्र अहमद पटेल यांच्या नावाचा उद्धार करून गुजरात निवडणुकीत कुणी हिंदू-मुसलमान मतांची फाळणी करून निवडणुका जिंकू पाहत आहेत का? हादेखील प्रश्न उद्या उपस्थित होऊ शकतो.' अहमद पटेल यांचे नाव पुढे करुन नरेंद्र मोदी हिंदु-मुलसलमान कार्ड खेळत आहेत का? असा थेट सवालच त्‍यांनी पंतप्रधानांना केला.  

 

पायाखालची वाळू सरकली की पाकिस्‍तान व दाऊदची जपमाळ ओढायची हा नापाकपणाच
राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजप सरकारने शर्थ केली होती. तोच शर्थीचा डाव त्यांनी पाकविरोधात लावला तर पाकड्यांचा हिंदुस्थानविरुद्ध एकही डाव यशस्वी होणार नाही', असे उद्धव ठाकरे म्‍हणाले. 'पायाखालची वाळू सरकली की पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची असाच प्रकार सध्या सुरू आहे. हा एकप्रकारे ‘नापाक’पणाच आहे. मागे बिहार निवडणुकीच्या प्रचारातही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पाकिस्तानला घुसवलेच होते. बिहारात नितीशकुमारांचा विजय झाला तर पाकिस्तानात फटाकेच फटाके फुटतील, अशी भविष्यवाणी श्री. शहा यांनी करूनही तेथे भाजपचा दारुण पराभव व नितीशकुमारांचा विजय झाला. त्याच नितीशकुमारांबरोबर आता भाजप सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे पाकिस्तानात फटके फुटले की भूकंप झाला हे कळायला मार्ग नाही', असा टोला निवडणुकीत वारंवार पाकिस्‍तानचे नाव घेणा-या भाजपला त्‍यांनी लगावला.  

 

आरोप काय यशवंत सिन्‍हा, नाना पटोले पण करतात
गुजरात निवडणुकीत पाकिस्तान छाप भिजलेल्या फटाक्यांचा धूर निघत आहे. मोदी यांनी असाही आरोप केला आहे की, मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत मीडियात वृत्त होते. मोदी यांनी आरोप केले, पण सरकारकडे प्रचंड ताकदीची गुप्तचर यंत्रणा असते. तरीही पाकसोबतच्या बैठकीचे वृत्त पंतप्रधानांना मीडियातून कळले. तेव्हा हीसुद्धा बाब तितकीच गंभीर आहे. पुन्हा पाकच्या हस्तक्षेपावर प्रचारसभांतून का बोलता? असा हस्तक्षेप सुरू असेल तर पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल? आरोपांच्या फैरी काय, यशवंत सिन्हा व नाना पटोलेसुद्धा झाडतात, अशा शब्‍दांत त्‍यांनी पंतप्रधान मोदी व भाजवर हल्‍लाबोल चढवला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेपावरुन राजकारण तापले...

 

 

बातम्या आणखी आहेत...