आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीत युती संपुष्टात; भाजपचा उमेदवार ठरेना, काँग्रेसचे आघाडीचे गुऱ्हाळ सुरू!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजप व शिवसेनेची युती जवळपास संपुष्टात आली  आहे. शिवसेनेने या मतदारसंघासाठी अकोल्याहून विप्लव बाजोरिया यांना आयात करीत या निवडणूक रिंगणात षड्डू ठोकण्याचे ठरविले आहे.

 

रविवारी (दि.२९) बाजोरिया यांची उमेदवारी मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.  
विधानपरिषदेच्या परभणी हिंगोली मतदारसंघासाठी येत्या २१ मे ला मतदान होणार असून ३ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. मात्र, काॅंग्रेस आघाडी व युतीतील तडजोडीची गुऱ्हाळे गेल्या आठ दिवसांपासून सुरूच असल्याने अद्याप जागावाटप व उमेदवारच निश्चित झालेले नाहीत.  


शिवसेनेने एकला चलो रे ची आक्रमक भूमिका घेत या जागेवर उमेदवार उभा करण्याचे ठरवले. मुंबईतूनच या जागेसाठी शिवसेनेने उमेदवाराचा शोध सुरू केला होता. त्याप्रमाणे अकोला स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.गोपीकिशन बाजोरिया यांचे पूत्र विप्लव बाजोरिया यांच्या नावाची चर्चा मागील तीन दिवसांपासून सुरू होती. त्याप्रमाणे विप्लव यांनी दोन दिवसांपूर्वी परभणीत येऊन खा.संजय जाधव, आ.डाॅ.राहुल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती.

 

त्यानंतर रविवारी (दि.२९) शिवसेनेच्या खासदार, आमदारांसह जिल्हाप्रमुखांना मुंबईत मातोश्रीवर पाचारण करण्यात आले होते. त्याप्रमाणे खा.संजय जाधव, आ.डाॅ.राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, डाॅ.संजय कच्छवे, आ.जयप्रकाश मुंदडा यांच्यासह हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगड, संपर्कप्रमुख आनंद जाधव आणि नगरसेवक राम कदम  रविवारी मुंबईत दाखल झाले. तेथे झालेल्या बैठकीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांना पक्षाचा अधिकृत एबी अर्जही देण्यात आला.  बाजोरिया हे सर्वार्थाने सक्षम आहेत. शिवसेनेचे या मतदारसंघात ९१ सदस्य असले तरी बाजोरिया यांच्या उमेदवारीने घोडेबाजार अधिकच वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढतीची शक्यता आहे.  

 

भाजपचा उमेदवार ठरेना-


यापूर्वी युतीत भाजपच्या वाट्याला असलेल्या या मतदारसंघासाठी भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपकडून डाॅ.प्रफुल्ल पाटील व सुरेश नागरे यांची नावे चर्चेत आहेत. यातही भाजपमध्ये दोन गट पडल्याने  पक्षाची कोअर कमिटी सोमवारी उमेदवार जाहीर करेल. 

 

राष्ट्रवादीकडेच जागा राहील-


काॅंग्रेस आघाडीचेही त्रांगडे सुटलेले नाही. विद्यमान आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह राष्ट्रवादीची   नेतेमंडळी आपली जागा कायम राखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. तर काँग्रेस तडजोडीत ही जागा सोडवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. याबाबतचाही निर्णयही सोमवारी होण्याची शक्यता आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परभणीची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचा विश्वास रविवारी पुण्यात दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आ. बाबाजानींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.  

बातम्या आणखी आहेत...