आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेच्या मतदानाचा टक्का वधारला; नाशिकमध्ये ९२, तर मुंबईत ८३ टक्के मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई शहरासह उपनगर, कोकणात पावसाची संततधार असली तरी सोमवारी झालेल्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात भरघोस मतदान झाले. मुंबई पदवीधर मतदारसंघात ५३.२३ टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात ८३.२६ टक्के, कोकण पदवीधर मतदारसंघात ७३.८९ टक्के तर नाशिक शिक्षक मतदारसंघात ९२.३० टक्के मतदान झाले. 


मुंबई पदवीधर मतदारसंघात शहरी भागात ५३.२० तर उपनगरात ५३.२४ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजता येथे ३३.४९ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत ही टक्केवारी ४४.११ टक्क्यांवर पोहोचली. मुंबई शिक्षक मतदारसंघात शहरी भागात ८३.७५ तर उपनगरात ८३.१५ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत येथे ५७.८२ टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ७७.९३ पर्यंत पोहोचली होती. कोकण पदवीधर मतदारसंघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ८८.०६ टक्के मतदान झाले. रायगडमध्ये ८१.०७, रत्नागिरीत ७९.८१, ठाण्यात ७०.७५ तर पालघरमध्ये ६३.८९ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत येथे ४४.५८ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत येथे ५६.४७ टक्के मतदान झाले होते. नाशिक शिक्षक मतदारसंघातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. नंदुरबारमध्ये सर्वात जास्त म्हणजे ९५.०८ टक्के मतदान झाले. धुळ्यात ९२.२७, जळगावमध्ये ९१.८९ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.


नगरमध्ये ९२. १४ % मतदान 
अहमदनगरमध्ये ९२.१४ आणि नाशिकमध्ये ९१.८० टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत येथे ४५.८३ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत ही टक्केवारी ६८.२९ टक्के झाली होती. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपचे अॅड. अमित मेहता, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. राजेंद्र कोरडे, अपक्ष दीपक पवार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरस्कृत उमेदवार राजू बंडगर यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. 


मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदीप बेंडसे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत.प्रथमच मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानामुळे मतदारांनी कोणाला कौल दिला हे येत्या २८ तारखेला होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल. 

बातम्या आणखी आहेत...