आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय वारली चित्रकार पद्मश्री जिव्या म्हसे यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नाशिक - आदिवासी पाड्यावरील वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन एक वेगळी ओळख देऊन लोकप्रिय करणारे आणि देशातील पहिले पद्मश्री पुरस्कारप्राप्त आदिवासी चित्रकार जिव्या सोमा म्हसे (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी पालघर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची दोन्ही मुलेही वारली चित्रकलेत पारंगत असून एक मुलगा वर्षातून तीन महिने जपानच्या म्युझियममध्ये काम करतो.

 

जिव्या म्हसे यांचा जन्म पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गंजाड गावात १३ मार्च १९३१ रोजी झाला. रूढी-परंपरांचा पगडा असलेल्या आणि प्रचंड मागासलेल्या आदिवासी समाजात ते वाढले. आदिवासी पाड्यावरील बायका लग्नसमारंभात घराच्या भिंतींवर वारली चित्रे काढायच्या.   


तारप्याभोवती फेर धरून होणारा नाच, लग्नाचा मांडव, लग्नाचा चौक अशा असंख्य चित्रांचे म्हसे यांना लहानपणापासूनच आकर्षण वाटायचे. वारली चित्रे फक्त सुवासिनींनीच काढायची ही आदिवासींमध्ये प्रथा हाेती, मात्र वयाच्या तेराव्या वर्षी म्हसे यांनी ती मोडली. पारंपरिक वारली चित्रांच्या सोबत त्यांनी प्राणी, पक्षी, फुलांनाही वारली चित्रकलेच्या साच्यात मोठ्या खुबीने बसवले. भारतातील आदिवासी कला जगासमोर याव्यात आणि त्यांच्या कलात्मक वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात एक शोधमोहीम राबवली होती. त्या मोहिमेतील भास्कर कुलकर्णी यांनी जिव्या सोमा म्हसे यांची कला पाहिली. त्यानंतर म्हसे दिल्लीत पोहोचले आणि वारली चित्र संस्कृती लोकप्रिय केली. 

 
वारली चित्रकलेला त्यांनी देशाबाहेर नेऊन लोकप्रिय केले. त्यांची कला पाहून रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांनी त्यांना कलाकुसर दाखवण्यासाठी निमंत्रित केले होते. बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांची बक्षिसीही दिली होती, तर जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला होता. म्हसे यांचा १९७६ मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झाला. त्यानंतर देशातल्या अनेक कला दालनांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरवण्यात आली. राज्य सरकारच्या मदतीने वारली चित्रकलेच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक वर्कशॉप घेतले. आपल्या परिसरातील शेकडो अदिवासी मुलांना वारली कला शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. म्हसे यांना २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


१९७६ मध्ये त्यांचा राष्ट्रपती पुरस्कारानेही गाैरव झाला हाेता. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी म्हसे यांना साडेतीन एकरची जमीन देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही या  कलाकाराच्या पदरात ही जमीन पडली नाही.

 

बेल्जियमच्या राणीकडून १७ लाखांची बक्षिसी
रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम या देशांनी म्हसे यांना कलाकुसर दाखवण्यासाठी निमंत्रित केले हाेते. बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांची बक्षिसी दिली. जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्ते गौरव झाला हाेता.

 

आदिवासी चित्रकलेचा श्रेष्ठ उपासक-प्रसारक हरपला : मुख्यमंत्री   
वारली या आदिवासी चित्रकलेला वैभव प्राप्त करून देणारे ख्यातनाम कलाकार पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांच्या निधनाने आदिवासी समूहाची वैशिष्ट्यपूर्ण कला-संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारा उपासक-प्रसारक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘पालघर जिल्ह्यासारख्या दुर्गम भागातील वारली चित्रकला सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या म्हसे यांच्या धडपडीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृतीचे विविध पदर उलगडले. आज वारली चित्रकला ख्यातीप्राप्त झाली असून तिच्या माध्यमातून आदिवासी समूहाचा श्रेष्ठ असा कलाविष्कार समर्थपणे व्यक्त होत आहे. त्यामागे म्हसे कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. म्हसे यांच्या कार्याची दखल पद्मश्रीसारख्या नागरी पुरस्काराने देशाने घेतली असून अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा झालेला गौरव त्यांच्या कलेची महत्ता दर्शवणारा आहे,’ असे मुख्यमंत्री शाेकसंदेशात सांगतात.

बातम्या आणखी आहेत...