आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट ही तर त्यांनीच पेरलेली अफवा व खोटी बातमी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट होते तेव्हा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपकडून त्यांच्या हत्येच्या कटाची बातमी पेरली जाते, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. मोदींची घटलेली लोकप्रियता पाहून ती वाढविण्यासाठी भाजपकडे याशिवाय दुसरा कोणताही पर्यायच नाही अशा शब्दांत भाजपचीही खिल्ली उडविली.

 

काेरेगाव भीमा प्रकरणात अटक केलेल्या पाच अाराेपींना गुरुवारी न्यायालयासमाेर हजर करून सरकारी पक्षाने त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा युक्तिवाद केला. इतकेच नव्हे तर ‘राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे देशात पुन्हा अात्मघातकी हल्ला करण्याच्या दृष्टीने नक्षलवादी नेते विचार करत अाहेत. तसेच माेठा शस्त्रसाठ्याचा पुरवठा करण्यात अाला अाहे,’ असा उल्लेख असलेले नक्षलवादी चळवळीतील बड्या नेत्याचे पत्र या अाराेपींकडील दस्तएेवजात पाेलिसांना सापडल्याचा गाैप्यस्फाेट सरकारी वकिलांनी गुरूवारी पुण्याच्या न्यायालयात केला. सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख व राजीव यांच्यासोबत तुलना केल्याने व नंतर माध्यमांत 'मोदींच्या हत्येचा कट' अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत. त्यानंतर निरूपम यांनी भाष्य केले आहे. 

 

संजय निरूपम म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांची जुनी एक टॅक्टिक आहे. जेव्हा जेव्हा त्यांची लोकप्रियता घटते तेव्हा तेव्हा ते अशा प्रकारच्या बातम्या पेरतात. त्यामुळे आताही पंतप्रधान म्हणून त्यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे तर राहुल गांधी यांना जनसमर्थन मिळू लागताच भाजपच्या पायाखालची वाळू निसटू लागली आहे. देशभर भाजपचा जनाधर कमी होत होत चालला आहे. मात्र, आताच्या मोदींच्या हत्येच्या कटाबाबत मी काही खात्रीने सांगू शकत नाही मात्र मोदींचा आतापर्यंतचा व्यवहार पाहता त्यास शंकेस नक्कीच वाव आहे असे निरूपम यांनी म्हटले आहे. तसेच मोदींच्या हत्येचा कट या घटनेची चौकशी व्हावी व सत्य जनतेसमोर आले पाहिजे असेही त्यांनी मागणी केली. 

 

जून 2004 मध्ये गुजरात पोलिसांनी इशरत जहांसह चार जणांना ठार मारले होते. पुढे ही कारवाई वादात सापडली व या चौघांना खोट्या चकमकीत मारल्याचे समोर आले. गुजरात पोलिसांनी त्यावेळी दावा केला होता की, हे चार जण तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ठार मारण्यासाठी आले होते. मात्र, नंतर हे सर्व प्रकरणच फेक असल्याचे समोर आले होते. आता त्याचाच संदर्भ देत संजय निरूपम यांनी मोदींच्या व्यवहारांबाबत गंभीर आरोप केले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...