आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेचे ११ आमदार बिनविरोध; घाेडेबाजार टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधानसभेतून ज्येष्ठ सभागृहात म्हणजेच विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ सदस्यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी साेमवारी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सर्वच्या सर्व ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच या निवडणुकीत एकेका मतासाठी होणारा घोडेबाजारही त्यामुळे टळला आहे.  


राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस ३, शिवसेनेचे २, शेकाप आणि रासप प्रत्येकी १ अशा ११ सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत २७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ११ अर्ज अपेक्षित होते. मात्र, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपच्या तिकिटावर अर्ज भरण्यास नकार दिला होता. त्यांनी ‘रासप’च्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे भाजपने १२ वा उमेदवार रिंगणात उतरवला होता. परिणामी मतदान होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज देशमुख यांना शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि मतांसाठी होणारा घोडेबाजारही टळला. सायंकाळी पाच वाजता सर्व ११ उमेदवारांना निवडून आल्याची प्रमाणपत्रे निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. या निवडीमुळे भाजप-शिवसेनेच्या परिषदेतील संख्याबळात मोठी वाढ झाली अाहे. त्यामुळे सध्या विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्यास आलेले सभापती आणि उपसभापतिपद धोक्यात आले आहे. 


नूतन अामदार   
भाजप (४) : भाई विजय गिरकर, रमेश पाटील, निलय नाईक, राम पाटील-रातोळीकर.   
शिवसेना (२) : अनिल परब, मनीषा कायंदे.   
काँग्रेस (२) : शरद रणपिसे, डाॅ. वजाहत मिर्झा.   
राष्ट्रवादी काँग्रेस (१): बाबाजानी दुर्राणी.   
रासप (१): महादेव जानकर. शेकाप (१) : भाई जयंत पाटील.   


मुंबईत शपथविधी  
नवनियुक्त ११ सदस्यांची मुदत २७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. सध्या नागपुरात चालू असलेले पावसाळी अधिवेशन २० जुलै रोजी संस्थगित होत आहे. त्यामुळे या नवनियुक्त ११ सदस्यांचा शपथविधी मुंबईत होईल. त्यासाठी एक दिवसाचे अधिवेशनही बोलावले जाऊ शकते.  


सत्ताधारी- विराेधकांचे संख्याबळ सेम-सेम
७८ सदस्य मर्यादा असलेल्या विधान परिषदेत आता काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे एकूण ३४, अधिक शेकाप २, जदयू १, पीआरपी १  अाणि १ पुरस्कृत सदस्य असे ३९ सदस्यबळ आहे. तर भाजप-शिवसेनेकडे  दोघांचे एकत्रित ३४, रासप १ आणि ४ पुरस्कृत-अपक्ष असे ३९ संख्याबळ आहे.   

बातम्या आणखी आहेत...