आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- तब्बल सात वर्षांनंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील ग्रामपंचायतींपासून ते महापालिकांपर्यंतच्या पाणीपट्टीचे दर वाढवले असून घरगुती वापरासाठी सुमारे १७ टक्के आणि औद्योगिक वापरासाठी ५० टक्क्यांपर्यंत पाणीपट्टी वाढवण्यात आलेली आहे.
एक हजार लिटरमागे ग्रामपंचायतींना १३.२ पैशांवरून १५ पैसे, नगरपालिकांसाठी १५.८ पैशांवरून १८ पैसे, महापालिकांसाठी २१ पैशांवरून २५ पैसे, तर टाऊनशिपसाठी २१ पैशांवरून १.२५ रुपये इतकी दरवाढ करण्यात आली आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बिअर उत्पादक उद्योगांसाठी सर्वाधिक १६ रुपयांवरून १२० रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी दिली.
के. पी. बक्षी म्हणाले, गेल्या ७ वर्षांत महागाई निर्देशांकात ६३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. पाण्याचा वापर वाढल्याने पाणीपट्टीत वाढ करणे आवश्यक होते, त्यानुसार पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सिंचन व्यवस्थापनाच्या आस्थापनेसह संपूर्ण खर्च वसूल होईल, अशा रीतीने पाणीपट्टीचे दर वाढवण्याची अधिनियमात तरतूद आहे. त्यानुसार एकूण खर्चाची ५९ टक्के वसुली औद्योगिक क्षेत्राकडून, तर २२ टक्के घरगुती वापरातून आणि १९ टक्के वसुली कृषी क्षेत्रातून करण्यात येणार आहे. नव्या पाणीपट्टीनुसार मीटर न बसवता पाणी घेणाऱ्या नगरपालिका, महापालिका आणि उद्योगांना दीडपट दर द्यावा लागणार आहे. तर, जलसंपदा विभागाशी करार न करता पाणी उचलणाऱ्यांना दुप्पट दर द्यावा लागणार आहे. प्रवाही कालव्यावरील शेतकरी आणि उपसा योजनेवरील शेतकरी यांच्यातील पाणीपट्टी दरातील तफावत दूर करण्याचाही निर्णय घेण्यात आला. आता शासकीय उपसा सिंचन योजनेवरील शेतकऱ्यांना पाणीपट्टी आणि १९ टक्के वीज बिलाचा भार सोसावा लागणार आहे.
स्वराज्य संस्थेनुरूप पाणी वापराचेही नियोजन
पाणीपट्टी वाढवतानाच पाणी वापराचे नियोजनही करण्यात आले आहे. यानुसार ग्रामपंचायतीसाठीची प्रति व्यक्ती ४० लिटरची मर्यादा ५५ लिटर करण्यात आली आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेत प्रति व्यक्ती ७० लिटर, ‘ब’ वर्ग नगरपालिकेत प्रति व्यक्ती १०० लिटर आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकेत प्रति व्यक्ती १२५ लिटर पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. मुंबई महापालिका सोडून ज्या महापालिकांची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कमी आहे तिथे प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणी दिले जाणार आहे, तर मुंबईत प्रति व्यक्ती १५० लिटर पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नवे दर १ फेब्रुवारीपासून लागू होणार
पाणी वापरासाठीचे सुधारित दर आगामी १ फेब्रुवारी २०१८ पासून, तर सिंचनासाठीचे सुधारित दर आगामी उन्हाळी हंगाम २०१८ पासून लागू होणार आहेत. वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी पाण्याचा दर खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे प्रति एक हजार लिटरसाठी ४.५० पैसे, ८ पैसे आणि १३.५० पैसे राहणार असून पाणी वापर स्थापनेस प्रोत्साहन देण्यासाठी या दरात २५ टक्के सूट देण्यात आलेली आहे. तसेच सूक्ष्म सिंचनासाठीही या दरामध्ये २५ टक्के प्रोत्साहनात्मक सूट देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.