आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या सतरा महिन्यांत राज्यात २६ हजार बालकांचा मृत्यू; पंकजा मुंडे यांची धक्कादायक कबुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आॅक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८ या अवघ्या १७ महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात एकूण २६ हजार ६१९ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक कबुली महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण पावसकर, अमरसिंह पंडित, विक्रम काळे, सतीश चव्हाण आदींनी राज्यातील बालमृत्यूसंदर्भात गुरुवारी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 


त्यावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. ० ते १ वर्ष वयोगटातील २३ हजार ८६५ बालके आणि १ ते ५ वर्षे वयोगटातील २७५४ अशी २६ हजार ६१९ बालके १७ महिन्याच्या कालावधीत राज्यात मृत्यू पावली आहेत. हे बालमृत्यू कुपोषणाने झालेले नसून ते विविध कारणांमुळे झालेले आहेत, असा खुलासा त्यांनी उत्तरात केला आहे. 


राज्यात २ हजार ३०६ लोकसंख्येसाठी १ खाट उपलब्ध आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. राज्यातील मुलींची घटती संख्या विचारात घेऊन पीसीपीएनटीटी कायद्याच्या तरतुदींचा भंग करणाऱ्या विरोधात मे २०१८ अखेर ५८५ खटले दाखल करण्यात आले होते. त्यातील ३५० प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांत ११३ जणांना शिक्षा झाली असून ८२ जणांना सश्रम कारावास, तर १७ प्रकरणांत दंड ठोठावण्यात आला आहे. २०७ वैद्यकीय व्यावसायिकांची नावे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला कळवण्यात आली आहेत. ७२ डाॅक्टरांची सनद निलंबित केली अाहे. ५८ ताकीद देण्यात आली आहे, अशी माहिती सावंत यांनी एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. 


मराठवाड्यात सिंचनाची ५७ कामे सुरू : गिरीश महाजन 
विदर्भ १३४, मराठवाडा ५७, उर्वरित महाराष्ट्रात १४३ अशा ३३४ सिंचन प्रकल्पांची कामे सध्या सुरू असून त्यांची किंमत ८३,६७० कोटी असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. २०१५-१६ ते २०१७-१८ पर्यंत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या १६,५२१ गावातील ५,५५,१५७ कामांपैकी ५,१६,३२१ कामे पूर्ण झाली. तर ३८ हजार ६८० कामे प्रगतिपथावर आहेत, असे जलसंधारण मंत्री राम शिंदे सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...