आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेव जानकर यांचा मुख्यमंत्र्यांनी पुरवला ‘हट्ट’, धनगर मतांकडे पाहून ‘रासप’ची उमेदवारी केली मान्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘विधान परिषद निवडणुकीत मी भाजपच्या तिकिटावर उभा राहणार नाही, पडलो तरी चालेल’, अशी अाग्रही भूमिका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शेवटपर्यंत ठेवली. तसेच जानकर यांनी आपला तिकिटाचा हेका काही सोडला नाही. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपवाद म्हणून भाजप उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगून ‘माणदेश’च्या या वाघाचा हट्ट पुरवला. 

 

मागच्या लाेकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांचा बारामतीतून पराभव झाला. त्यानंतर ते भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेवर आले. या वेळी मात्र त्यांनी भाजपचे तिकीट नाकारले. स्वत: संस्थापक असलेल्या रासप या पक्षाच्या तिकिटावर भाजपला न जुमानता अर्ज दाखलही केला. जानकर यांचा विधानसभेत फक्त एक आमदार आहे. परिषदेवर निवडून येण्यासाठी २७ आमदारांची मते लागतात. ‘पाठिंबा भाजपचा घेताय, तर तिकीटही भाजपचे घ्या’, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका होती. पण, शेवटपर्यंत जानकर बधले नाहीत.  त्यांनी ‘रासप’च्या एबी फाॅर्मवरच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने जानकर यांना इंगा दाखवण्यासाठी, दबाव वाढवण्यासाठी  पृथ्वीराज देशमुखांच्या रूपाने १२ वा उमेदवार दिला. तरी जानकर यांनी हट्ट सोडला नाही. शेवटच्या दिवशी भाजपनेच माघार घेतली आणि आपला १२ व्या उमेदवाराचा अर्ज सपशेल मागे घेत निवडणुका बिनविरोध केल्या. 

 

राणेंचा ‘स्वाभिमान’ही भाजपने गुंडाळला 

विधान परिषदेत भाजपने शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे  यांना, तर राज्यसभेत  रामदास आठवले यांना भाजपच्या तिकिटावर उमेदवारी देत निवडून अाणले.  ‘तुमच्या पक्षाच्या तिकिटावर भाजपला पाठिंबा देता येणार नाही. हा आमच्या संसदीय मंडळाचा नियम आहे’, असे या काठावरच्या नेत्यांना भाजपचे उत्तर ठरलेले असे. नारायण राणे जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांची खासदारकी बरेच दिवस तिकिटाच्या याच नियमामुळे अडकली होती. शेवटी राणे यांनासुद्धा भाजपच्या तिकिटावर अर्ज भरायला भाग पाडण्यात आले. बड्या बड्या दिग्गजांना नियमाचा बडगा दाखवणारी भाजपने महादेव जानकर यांच्यासाठी मात्र आज अपवाद केल्याचे दिसले. 

 

शुक्लकाष्ठ टळले 

भाजप आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वीच जानकर यांनी ‘रासप’ तिकिटावर उमेदवारी दाखल केली. म्हणून पक्षांतर बंदी कायद्यान्वये त्यांची निवड अपात्र ठरू शकते, असे दावे विरोधकांनी केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या आदल्या दिवशी रात्री जानकर यांनी सभापतींकडे राजीनामा सादर केला होता. त्यामुळे अपात्रतेचा विषय संपला आहे, असे विधिमंडळ सचिवालयातील सूत्रांनी सांगितले. 

 

धनगर मतांवर डोळा 

मागच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाच्या मतांचा भाजपला मोठा फायदा झाला होता. सोलापूर विद्यापीठ नामविस्तार आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ, या धनगर समाजाच्या मागण्या भाजपला चार वर्षांत पूर्ण करता आलेल्या नाहीत.  जानकर धनगर समाजाचे मास लीडर आहेत. त्यामुळे अपवाद म्हणून जानकर यांची रासपच्या तिकिटावरील उमेदवारी भाजपने मान्य केल्याचे सांगितले जात आहे.  

बातम्या आणखी आहेत...