आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने माफी मागावी : लाड; भूखंड घाेटाळा अाज गाजणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवी मुंबईतील सिडकाेच्या भूखंडाचा मुख्यमंत्री कार्यालयाच्या मदतीने घोटाळा केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी तीन दिवसांच्या आत पत्रकार परिषद घेऊ माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर ५०० काेटींचा दावा ठाेकला जाईल, असा पुनरुच्चार भाजप अामदार प्रसाद लाड यांनी बुधवारी 'दिव्य मराठी'शी बाेलताना केला. तत्पूर्वी लाड यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना याबाबतची कायदेशीर नाेटीसही पाठवली आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांनीही नाेटीस मिळाल्याचे सांगत हा मुद्दा गुरुवारी विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले. 


अधिवेशनाच्या पूर्वी पृथ्वीराज चव्हाण, संजय निरुपम आणि सुरजेवाला यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत प्रसाद लाड यांच्यावर आरोप केले होते. नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेचा मोठा घोटाळा झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला हाेता. या घोटाळ्यात मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असून सिडकोच्या ताब्यातील १६०० कोटी रुपयांची ही जमीन तीन कोटी रुपयांत बिल्डर मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली. बिल्डर भालेराव हे प्रसाद लाड यांचे खास दोस्त आहेत. प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक सहकारी आहेत. त्यामुळे लाड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

 
या पत्रकार परिषदेनंतर लाड यांनी त्वरित आरोप खोडून काढत खोटे आरोप केल्याने काँग्रेसविरोधात ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करीन, असे म्हटले होते. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण आणि संजय निरुपम यांना त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली अाहे. त्यात तीन दिवसांत आरोप मागे घेण्यास सांगितले असून तसे न केल्यास ५०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असे लाड म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...