आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकऱ्या मागणारे नव्हे, तर देणारे बना, संस्कृतीस हातभार लावा; राष्ट्रपतींचा युवकांना मंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बना, असा मंत्र देशाचे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी रविवारी दिला. उत्तन (जि. ठाणे) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आर्थिक जनतंत्र परिषद (इकोनॉमिक डेमोक्रॅसी कॉन्क्लेव्ह) चे उद््घाटन करताना ते बोलत होते. 


या वेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला,  डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांच्यासह मुद्रा योजना, दलित व्हेंचर कॅपिटल, स्टार्टअप अशा योजनांचा लाभ घेतलेले २०० उद्योजक उपस्थित होते. राष्ट्रपती म्हणाले, संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती व वातावरण निर्माण करण्यास हातभार लावावा. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो अशी अगतिकता असू नये; तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेन पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेन, स्वत:चा व्यवसाय सुरू करेन, अशी भावना त्यामागे हवी.  


‘डिक्की’ सारखी संस्था त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असल्याबद्द्ल राष्ट्रपतींनी संस्थेचे कौतुक केले. आर्थिक जनतंत्रात बँकांची भूमिकाही महत्त्वाची असून जनधन योजनेमुळे ३० कोटींहून अधिक लोकांनी बचत खाती उघडली, ज्यात ५० टक्के महिला आहेत.  महिलांनी आता केवळ बचत करण्याची प्रवृत्ती सोडून गुंतवणूक करायला शिकले पाहिजे, असेही ते म्हणाले.


युवा उद्योजकांचा देश म्हणून ओळख : मुख्यमंत्री  
युवा शक्ती देशाची ताकद आहे, त्यांच्यात नवनिर्माणाचा दृष्टिकोन आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी स्टार्ट अप, मुद्रा, कौशल्य विकाससारख्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. भारत युवकांचा नव्हे तर युवा उद्योजकांचा देश म्हणून ओळखला जाईल, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...