आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रविवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील सव्वा लाख हेक्टर शेती बाधित झाली असून गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामातील फळांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे तीन मृत्यूही झाले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीचा निर्णय घेतला जाणार आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिव्य मराठीशी बोलताना ही माहिती दिली.
गेल्या तीन वर्षांपासून सतत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. शेतकरी कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला असतानाच आता गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून देण्याचे काम राज्य सरकारला करावे लागणार आहे. विमा कंपन्या आणि एनडीआरएफकडून नियमानुसार मदत दिली जाणार असली तरी राज्य सरकारलाही तिजोरीतून पैसे द्यावे लागणार आहेत. गारपिटीच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.
यापूर्वीचे मदतीचे आकडे
२०१६ : फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये, गारपीटाने मृत पावलेल्या मोठया जनावरांसाठी २५ हजार रुपये
पक्क्या घरांचे नुकसान झालेल्यांसाठी ७० हजार रुपये : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १० हजार तर गारपीटीने मृत पावलेल्या शेळयांची भरपाई म्हणून ३,५०० रुपये देण्यात आले.
२०१५ : मध्ये अवकाळी पावसामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत
- कोरडवाहू क्षेत्रात नुकसान झाल्यास ६५०० रुपये प्रति हेक्टरी तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार प्रति हेक्टरी मदत
- बागायतीसाठी १३,५०० प्रति हेक्टरी, तर पशुधन प्रति म्हैस गाय ३० हजार, बैल २५ हजार, गाढव ,रेडकू १५ हजार, शेळी मेंढी ३ हजार प्रति अशी मदत देण्यात आली.
२०१४ : मध्ये कोरडवाहूसाठी १० हजार प्रति हेक्टरी, बागायतीसाठी १५ हजार प्रति हेक्टरी, बहूवार्षिक फळबागेसाठी २५ हजार प्रति हेक्टर
- अवकाळी पावसामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला २.५० लाख, (सरकारी १.५० अधिक मुख्यमंत्री निधी एक लाख),
- मोठ्या जनावरासाठी २५ हजार, मध्यम जनावरासाठी १० हजार, लहान जनावरासाठी ३५०० रुपये पक्के घर पडले असेल तर ७० हजार रुपये.
- कच्च्या घरासाठी २५ हजार आणि अंशतः नुकसान झाले तर १५ हजार, जमीन खरडली गेली तर २० हजार प्रति हेक्टर आणि जमीन वाहून गेली असल्यास २५ हजार प्रति हेक्टर आणि तीन महिन्याचे वीजबिल माफ.
परळीत गारपीट
मंगळवारी परळी तालुक्यातील काही गावांत तर कंधार तालुक्यातही अनेक भागांत गारपीट झाली. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुक्यांतील १५ ते २० गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी पाऊस आणि जाेरदार गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. विशेषत: गारपिटीचा गहू, आंबा, संत्री, मोसंबी आणि भाजीपाला पिकांना प्रचंड फटका बसला.
विदर्भात एक बळी
विदर्भात बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांतील ४५ गावांना मंगळवारी गारपीटीचा फटका बसला. अवकाळी पावसासह गारपिटीने सिंदखेडराजा तालुक्यातील चार तर मेहकर तालुक्यातील ४१ गावांना झोडपले. पाऊण तास गारपीट झाली. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, पुसद तालुक्यात कोपरा येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.