आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआय जज लोया मृत्यू प्रकरण: पित्याचा मृत्यू हृदयविकाराने, त्रास देऊ नका; मुलाचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यायाधीश लोया यांचा मुलगा अनुज लोया - Divya Marathi
न्यायाधीश लोया यांचा मुलगा अनुज लोया

मुंबई- विशेष सीबीआय जज बी. एच. लोया यांच्या नागपूूरमध्ये झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी होत असताना त्यांच्या मुलाने मात्र या प्रकरणी आम्हाला त्रास देऊ नका, अशी विनंती करत पित्याच्या मृत्यूबद्दल कुटुंबाला कोणतीही शंका नसल्याचे जाहीरपणे सांगितले.


आम्हाला आता कोणताही संशय नसून काही दिवसांपासून  घडत असलेल्या घडामोडींमुळे व्यथित झाल्याची भावना अनुज याने व्यक्त केली. रविवारी मुंबईत वकिलांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भावना व्यक्त करत या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन अनुज यांचे वकील अॅड. अमित नाईक यांनी केले.


सोहराबुद्दीन चकमकीची सुनावणी करणारे न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यावरून वादंग आहे. चार ज्येष्ठ न्यायमूर्तींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनावर आरोप केले तर लोया मृत्यू प्रकरण हेही नाराजीचे कारण असल्याचे न्या. रंजन गोगोई यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अनुज लोयाने घेतलेली पत्रकार परिषद महत्त्वाची ठरली आहे. 


या पत्रकार परिषदेस अनुजसह वकील अॅड. नाईक, आतेभाऊ प्रतीक भंडारी आणि कौटुंबिक स्नेही माजी न्यायमूर्ती ए. बी. काटके आदी उपस्थित होते.  पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला लोया कुटुंबीयांच्या वतीने बोलताना न्या. काटके म्हणाले की, काही स्वयंसेवी संस्था, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते काही दिवसांपासून लोया कुटुंबीयांशी संपर्क साधून नाहक त्रास देत आहेत. अनुज यांचे ८५ वर्षीय आजोबा आणि आई यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना घडत असलेल्या या प्रकाराने संपुर्ण कुटुंब त्रस्त आहे. त्यामुळे आम्ही प्रसार माध्यमांमधून असे आवाहन करत आहोत की, यापुढे लोया कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधून न्या. लोयांच्या मृत्यूबाबत कोणतीही विचारणा करू नये. न्या. लोयांच्या निधनामुळे तीन वर्षांपासून लोया कुटुंब व्यथित आहे. अनुजदेखील विधी शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. या प्रकरणात कोणतेही वादग्रस्त मुद्दे नसताना कुणीही याचे राजकारण करू नये, असे अनुज यांचे वकील अॅड. नाईक म्हणाले. 


पूर्वी संशय होता... आता नाही : अनुज
न्या. लोयांचा मृत्यू झाला त्या वेळी आमच्या मनात संशय होता. तेव्हा मी सतरा वर्षांचा होतो. भावनिकदृष्ट्या कोलमडून गेल्याने संशय येणे साहजिक होते. मात्र आता काही संशय नाही, असे अनुज म्हणाला. आजोबा आणि आत्याने हा संशय व्यक्त केला होता, याकडे अनुजचे लक्ष वेधले असता त्या वेळी भावनिक परिस्थिती वेगळी होती, असे अनुज याने सांगितले.


प्रकरण काय?
न्या. लोया यांचा नागपूरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये १ डिसेंबर २०१४ रोजी मृत्यू झाला होता. गाजलेल्या सोहराबुद्दीन चकमक प्रकरणाची सुनावणी त्यांच्याकडे होती. न्या. लोया यांच्या मृत्यूबद्दल गेल्या वर्षी ‘कारवां’ मासिकात अहवाल प्रसिद्ध झाला होता. यात न्या. लोया यांची बहीण आणि कुटुंबातील काही सदस्यांनी या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. राहुल गांधी यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर मंगळवारी सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...