आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळी आणि धान नुकसान भरपाईच्या मागणीसाठी गोंधळ; विधान परिषदेचे कामकाज तहकूब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विदर्भ-मराठवाड्यात मागच्या वर्षी कापूस पिकावर पडलेल्या बोंडअळी तसेच धानावरील तुडतुड्या आणि मावा रोगामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी, या विरोधकांच्या मागणीवरून गुरुवारी विधान परिषदेचे कामकाज कोणत्याही कामकाजाविना दिवसभरासाठी बंद पडले.

 
गुरुवारी विधान परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजास दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. सभापतींनी तारांकित प्रश्न पुकारल्या पुकारल्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उठले व त्यांनी कापसाच्या आणि धानाच्या नुकसान भरपाईचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे (२८९) उपस्थित केला. आपण दिलेल्या या प्रस्तावावर थोडक्यात बोलण्याची आपल्याला परवानगी मिळावी, अशी त्यांनी मागणी केली. सभापतींनी त्यास नकार दिला व प्रश्नोत्तरे चालू केली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरुवातीला २० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला. प्रश्नोत्तरे घेण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. मात्र, विरोधक चर्चेची मागणी करत राहिले. त्यामुळे माणिकराव ठाकरे यांनी ३० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. 


सरकारच्या धिक्काराच्या घोषणा 
दुपारी १ वाजता तालिका सभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी कामकाज पुकारले. विरोधकांच्या परत घोषणा चालू झाल्या. सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उतरले. 'शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', अशा घोषणा देऊ लागले. त्यामुळे डाॅ. गोऱ्हे यांनी संपूर्ण दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. 


हा आठवडा वाया जाण्याची शक्यता 
अधिवेशनाचा प्रारंभ सोमवारी होतो. या वेळी बुधवारी प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव असतात. शोकप्रस्तावाच्या दिवशी कामकाज करायचे नाही, अशी प्रथा आहे. दुसरा आणि तिसरा दिवस विरोधक सभागृह चालू देत नाहीत, हा काही वर्षांचा प्रघात आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी कामकाज होण्याची शक्यता नाही. शनिवार-रविवार अधिवेशनाला सुटी असते. कारण, आमदारांना आपापल्या गावी परतायचे असते. परिणामी तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनातील एक आठवडा कामकाजाविना जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...