आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेच्या जागा अकरा, रिंगणात उमेदवार मात्र बारा; निवडणूक बिनविरोध नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘रासप’ अध्यक्ष व पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास नाखूश आहेत. त्यामुळे भाजपने सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या कोट्यातून अधिकचा एक अर्ज दाखल केला आहे. परिणामी ११ जागांसाठी १२ उमेदवारांचे अर्ज आले अाहेत. मात्र यातील एक अर्ज साेमवारी मागे घेतला जाईल आणि निवडणूक बिनविरोध होईल, असे सर्वच  पक्षातील नेत्यांचे गृहितक आहे.  

 

विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या या ११ जागांपैकी पाच सदस्य निवडून देण्याइतपत भाजप विधानसभेत संख्याबळ आहे. मात्र पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा सहावा अर्ज दाखल करुन भाजपने बिनविरोध निवडणुकीसंदर्भात गूढ निर्माण केले आहे.  


अर्ज दाखल करण्याचा गुरुवार शेवटचा दिवस होता. आज भाजपकडून पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, भाई विजय गिरकर, राम पाटील- रातोळीकर, रमेश पाटील, निलय नाईक आणि पृथ्वीराज देशमुख यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडे दोन सदस्य निवडून देण्याइतपत संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेने डॉ. मनीषा कायंदे  आणि परिषदेचे गटनेते अनिल परब यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  


काँग्रेसकडे दोन सदस्य निवडून देण्याइतपत विधानसभेत संख्याबळ अाहे. त्यामुळे काँग्रेसने शरद रणपिसे  आणि वजाहत अख्तर मिर्झा यांचे अर्ज दाखल केले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाथरीचे बाबाजानी दुर्राणी यांचा अर्ज दाखल झाला आहे. राष्ट्रवादीची शिल्लक मते काँग्रेस आणि शेकाप उमेदवाराला जाऊ शकतात. अपक्ष, एमआयएम, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिल्लक मतांच्या भरोशावर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत  पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.   


१६ जुलै रोजी निवडणूक असून त्याच दिवशी निकाल आहे. मात्र सोमवारी भाजपने आपल्या सहाव्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल. ६ जुलै अर्ज छाननी अाहे. ९ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. १६ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान आहे.

 

जानकरांच्या भूमिकेवर ठरणार भवितव्य
जानकर यांना भाजपने आपल्या कोट्यातून उमेदवारी दिली. मात्र जानकर यांना भाजप ऐवजी ‘रासप’च्या तिकिटावर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे भाजपने एक अधिकचा उमेदवार दिला आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकरांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी  जानकर यांना पुढे संधी देण्यात येऊ शकते. त्यामुळे जानकर अर्ज मागे घेण्याची शक्यता अाहे.


विजय मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवारास २७ मतांचा काेटा
- विधानसभेतील पक्षीय बलाबल: भाजप १२३, शिवसेना ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१, शेकाप ३, एमआयएम २ , समाजवादी पक्ष १, रासप १,अपक्ष १३ अशी सर्वपक्षीय एकूण २८८ सदस्य संख्या आहे.  
-  विधानसभेत सर्वपक्षीय २८८ आमदार आहेत. त्यातून परिषदेवर म्हणजे ज्येष्ठ सभागृहात एकूण ११ उमेदवार निवडून द्यायचे असतात. म्हणजे एक उमेदवार निवडून द्यायचा असेल तर त्या पक्षाकडे विधानसभेतील २७ सदस्यांची मते हवीत.  

 

बातम्या आणखी आहेत...