आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा-विदर्भाच्या 5100 गावांचे कृषी उत्पन्न वाढणार! नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सतत दुष्काळाच्या छायेतील विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पाणी प्रश्न सुटावा यासाठी राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना गेल्या वर्षी आखली होती. त्यावर ४ हजार कोटींचा खर्च होणार आहे. पैकी २,७०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली अाहे. हे कर्ज ३० वर्षांसाठी असणार आहे.  उर्वरित १३०० कोटी राज्य सरकार देणार आहे. नुकताच याबाबत जागतिक बँक, केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये करार झाला.  याचा १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांतील शेतकऱ्यांना लाभ होईल. 


जागतिक बँकेच्या मंजुरीमुळे दुष्काळापासून शेतीचे संरक्षण व खारपाटण पट्ट्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कृषी संजीवनी प्रकल्पाला गती मिळाली आहे. यामुळे १५ जिल्ह्यांतील ७० लाख शेतकरी व ३० लाख हेक्टर जमिनीला लाभ मिळेल. योजनेची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, लहरी हवामानाचा शेतीला फटका बसून  कृषी उत्पादकता घटली आहे. यावर उपाय म्हणून कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून शेती समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

या जिल्ह्यांत योजना 
मराठवाडा -विदर्भात क्षारयुक्त जमीन असणाऱ्या १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांत शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी आणि जमिनीचे मृद संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड आणि लातूर या १५ जिल्ह्यात आणि खारपाटण पट्टा असलेल्या अकोला, अमरावती, बुलडाणा आणि मुक्ताईनगरमधील ९३२ गावांमध्ये ही योजना २०१८-१९ ते २०२३-२४ या काळात राबवली जाणार आहे.

 

योजनेची वैशिष्ट्ये

सीआरआयडीए व टेरीद्वारे विकसित शास्त्रीय निर्देशांकाचा वापर करून प्रकल्पांतर्गत समूह पद्धतीने गावांची निवड करणे, महसूल मंडळनिहाय उभारणी करण्यात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या माहितीस अनुसरून शेतकऱ्यांना कृषी हवामान सल्ला देणे, शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक नियोजन करणे.

 

वाढत्या तापमानाचा फटका 
वाढत्या तापमानामुळे पीक उत्पादकतेवर विशेषत: कोरडवाहू पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकासाठी पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये जास्त पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील कर्बामध्ये घट होऊन उत्पादकतेत घट होते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलाव्यात घट होते.

 

कृषी संजीवनी योजनेत होणार ही कामे 

या प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल कृषी पद्धतीस प्रोत्साहन, सहभागीय पद्धतीने गाव समूहाचा (लघू पाणलोट) नियोजन आराखडा विकसित करणे, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, जमिनीत कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढवणे, क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, मूलस्थानी जलसंधारण, पाणी साठवण संरचनांची निर्मिती, जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन, काढणीपश्चात व्यवस्थापन व कृषिमूल्य साखळीचे बळकटीकरण करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती, भाडे तत्त्वावर कृषी अवजारे केंद्र सुविधा निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्रीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणाली कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, सीड हबसाठी पायाभूत सुविधा, पीकनिहाय हवामान सल्ला, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आदी कामे होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...