आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरी रेल्वेस्थानकातील ४७ वर्षे जुना पादचारी पूल काेसळून ५ जखमी; माेटारमनने वाचले अनेक प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुसळधार पावसामुळे अंधेरी स्थानकातील ४७ वर्षांपूर्वी उभारलेल्या जीर्ण गाेखले पादचारी पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी अचानक काेसळला. या अपघातात सुदैवाने काेणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात अाले आहे, तर दाेन गंभीर जखमींना अतिदक्षता विभागात हलवण्यात अाले अाहे. पूल काेसळत असल्याचे लक्षात अाल्यानंतर प्रसंगावधान राखत मोटरमनने लाेकल थांबवल्यामुळे माेठी जीवितहानी टळली. या कामाचे कौतुक करत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले तसेच जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. पुलाचा बराचसा भाग रेल्वे रुळांवर पडल्याने तसेच अाेव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली हाेती.  दरम्यान, रेल्वेमंत्री गाेयल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या पुलाचे १२ नाेव्हेंबर राेजी सेफ्टी अाॅडिट झाले हाेते, त्यावेळी हा पुल सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र देण्यात अाले हाेते.  अाता गाेयल यांनी रेल्वे सेफ्टी कमिश्नर यांच्याकडे चाैकशी अहवाल मागवला.


साेमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने मुुंबईला झाेडपून काढले. पावसाची संततधार कायम असताना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास  पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे रुळावर पडला. अंधेरी पूर्व अाणि पश्चिम भाग जाेडणारा हा पूल १९७१ मध्ये बांधण्यात अाला हाेता. विविध प्रकारच्या वाहिन्या टाकण्यासाठी वारंवार करण्यात अालेल्या खाेदकामामुळे हा पूल जीर्ण झाला हाेता. त्यासाठी पुलाला लाेखंडाचा अाधार देण्यात अाला हाेता, असे स्थानिकांनी सांगितले.  पुलाचा माेठा भाग पडल्याने अाेव्हरहेड वायर तुटली. त्याचप्रमाणे माेठ्या प्रमाणावर मलबा झाल्याने एेन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची संपूर्ण लाेकलसेवा ठप्प झाली.  एनडीअारएफ, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.रेल्वे मार्गावरील ढिगारा उपसणे पावसामुळे जिकिरीचे हाेत हाेते.  अखेर एका माेठ्या क्रेनच्या मदतीने काम सुरू झाले. 


जबाबदारी स्वीकारण्यावरून पालिका रेल्वेचे तू- तू मै मै
एल्फिस्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचा कटू अनुभव गाठीशी असताना अाता अंधेरीचा गाेखले पादचारी पूल पडल्यानंतरही त्याची जबाबदारी काेणी घ्यायची, यावरून महापालिका प्रशासन अाणि रेल्वे यांच्यात तू- तू मै मै सुरू झाले अाहे. मुंबईचे महापाैर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा पूल रेल्वे प्रशासनांतर्गत येत असल्याने ही जबाबदारी रेल्वेची असल्याचे म्हटले अाहे. मात्र, पश्चिम रेल्वेने  महापालिकेचा हा दावा खाेडून काढला अाहे.  


कुर्ल्यात सर्वाधिक पावसाची नाेंद  
बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत कुर्ला येथे सर्वाधिक २०८ मि.मी. पावसाची नाेंद झाली.  कुर्ला येथे २०८ मिमी, विक्रोळी १९२ मिमी, घाटकोपर १८४ मिमी, परळ १७६ मिमी, धारावी १७४ मिमी, वडाळा १६२ मिमी, मरोळ, १८३, वर्सोवा १७५ मिमी व बोरिवली येथे १७२ मिमी पावसाची नोंद झाली.  


अाेव्हरहेड खांबही पडणार हाेता  
गाेखले पुलाचा मलबा हटवण्याचे तसेच अन्य मदतकार्याचे काम सुरू असतानाच अचानक रेल्वे रुळांवरील अाेव्हरहेड वायर असलेला खांब अचानक हलला अाणि काेसळू लागला. हा खांब पडत असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी एकच पळापळ झाली. सुदैवाने हा खांब पडत असताना समाेरच्या तारेमध्ये अडकल्यामुळे सुदैवाने अाणखी एक दुर्घटना टळली.


चाकरमानी राहिले उपाशी  
रेल्वे पूल दुर्घटनेमुळे लाेकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली हाेती. त्यामुळे  डबेवाला संघटनेने चाकरमान्यांना डबे पाेहोचवण्याची सेवा मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. काेणाच्याही घरातून डबे घेऊ नका अाणि घेतले असतील तर ते संबंधितांच्या घरी परत करा, अशा सूचना संघटनेतर्फे डबेवाल्यांना देण्यात अाल्या हाेत्या. 


शाळांना सुटी
पावसामुळे मुंबईअाणि उपनगरात झालेली वाहतूक काेंडी लक्षात घेऊन प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली हाेती. सकाळच्या वेळेत सुरू असलेल्या शाळा लगेच साेडून देण्यात अाल्या, तर दुपारच्या वर्गातील शाळांना सुटी देण्यात अाली. मुंबर्इ विद्यापीठाच्या विविध परीक्षा सध्या सुरू अाहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला पाेहोचू शकले नाहीत. 


काेपरी पूल दुर्घटनेची अाठवण
या दुर्घटनेमुळे नऊ वर्षांपूर्वीच्या ठाण्यातील काेपरे रेल्वे पुलाचा गर्डर काेसळून झालेल्या अपघाताची अाठवण झाली. काेपरी येथील रेल्वे उड्डाण पुलाचा गर्डर कुजलेल्या लाकडावरून सटकून जुन्या पाईप लाईन, पुलावर अादळून ताे थेट रेल्वेवर काेसळला. २२ अाॅॅक्टाेबर २००९ राेजी झालेल्या या दुर्घटनेत डाेंबवलीकडे येणाऱ्या लाेकलमधील माेटरमनसह दाेन जणांचा मृत्यू झाला हाेता तर ११ प्रवासी जखमी झाले हाेते. 


विरार स्थानकात शाॅर्टसर्किटमुळे अाग, सुदैवाने जीवितहानी नाही
अंधेरी स्थानकातील गाेखले पूल पडून काही तास उलटत नाहीत ताेच विरार स्थानकात केबलमध्ये शाॅर्टसर्किट हाेऊन सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक अाग लागली. अाग लागल्यानंतर धुराचे लाेट पसरू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. याच फलाटावर संध्याकाळी सहा वाजता डहाणूला जाणारी लाेकल उभी हाेती. सुदैवाने लाेकलमध्ये प्रवाशांची गर्दी फारशी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पाेहोचून अागीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर विरार स्थानकातून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात अाली.

 

६५ मीटर अाधीच ब्रेक दाबल्याने अनर्थ टळला
अवघ्या काही सेकंदाचा जरी फरक पडला असता तरी गाेखले पुलाखाली लाेकल येऊन शेकडाे प्रवाशांना अापले प्राण गमवावे लागे असते. मात्र, माेटरमन चंद्रशेखर सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे माेठी मनुष्यहानी टळली. हा हृदयद्रावक क्षण सांगताना सावंत म्हणाले की, सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी बाेरिवली येथून चर्च गेटच्या दिशेने माझी लाेकल निघाली. अंधेरी स्थानक साेडत असताना ५० प्रतिकिलाेमीरटरचा वेग हाेता. इतक्यात मला समाेरचा पूल काेसळत असल्याचे दिसले. त्यावेळी लाेकल अाणि पूलमध्ये केवळ ६५ मीटरचे अंतर हाेते. मी इमर्जन्सी ब्रेक लावून लाेकल तातडीने थांबवली. पण काही सेकंदाचा जरी फरक पडला असता तरी माेठा अनर्थ झाला असता. पुलाचा काही भाग काेसळल्याचे पाहिल्यानंतर मी तातडीने याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली, असे सावंत यांनी सांगितले. अापण अापले कर्तव्य बजावले, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...