आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- कामकाज स्थगित केल्यानंतरही निव्वळ संसदीय कामकाज मंत्र्यांच्या दबावापोटी तालिका अध्यक्ष कामकाज सुरू ठेवू पाहताहेत, असा आरोप करत विरोधकांनी विधानसभेत सोमवारी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली. तसेच सभागृह हे नियम आणि परंपरेनुसारच चालवले गेले पाहिजे, असे खडे बोल सुनावत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टोले लगावले.
विधानसभेत अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चा आणि संबंधित मंत्र्यांच्या उत्तरानंतर मागण्या मंजूर करण्यात आल्या. तशी घोषणा करत तालुकाध्यक्ष योगेश सागर यांनी दिवसभराचे कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाबाबतची घोषणा करण्यापूर्वी संसदीय कामकाज मंत्र्यांनी अजून एक विधेयक मंजुरीसाठी घ्यावयाचे आहे, असा मुद्दा मांडला. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या म्हणण्यानुसार योगेश सागर यांनी पुन्हा एकदा कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यावर अध्यक्षांनी दिवसभराचे कामकाज स्थगित केल्याची घोषणा केल्याने आता कामकाज करता येणार नाही असा तांत्रिक मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीचे सदस्य भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली. जाधव यांचा मुद्दा विरोधी बाकावरील सर्वच सदस्यांनी उचलून धरल्याने काही काळ सत्ताधाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला.
तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांनाही बसवले होते खाली
भास्कर जाधव यांनी या वेळी काही वर्षांपूर्वी विधानसभेत घडलेल्या प्रसंगाची आठवण दिली. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना एका मुद्द्यावर बोलण्यास उभे राहिले. त्यावेळी तालिका अध्यक्ष चंद्रकांत पडवळ यांनी आपण अनुमती दिली नसल्याने मुख्यमंत्र्यांनी खाली बसावे, असे आदेश दिले. मात्र जोशी उभेच राहिले. त्यावर अध्यक्षांनी परवानगी दिली नसल्याचा पुनरुच्चार केला. अखेर अध्यक्षांनी दिलेल्या या निर्देशाचा मान राखत जोशी जागेवर बसले. दिवसभराचे कामकाज आटोपल्यानंतर पडवळ हे जोशी यांच्या दालनात गेले आणि घडलेल्या प्रसंगाबद्दल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले “सर आपण माझे नेते आहात. मात्र, मी अध्यक्षांच्या आसनावरून कामकाज चालवत असल्याने मला आपल्याला काही आदेश द्यावे लागले. यामागे आपला उपमर्द करण्याचा हेतू नव्हता.’ त्यावर जोशी म्हणाले, “चंद्रकांत तू केलेस ते योग्य होते. त्यामुळे अध्यक्षांच्या आसनाचा मान राखला गेला.’ हा किस्सा सांगत सागर यांना उद्देशून भास्कर जाधव म्हणाले की, अध्यक्ष महोदय तुमच्याकडून आम्हाला अशा न्यायाची अपेक्षा होती. मात्र, आपण सत्ताधारी पक्षाच्या विनंतीनुसार कामकाज सुरूच ठेवले आहे. तरीही आम्ही त्यात सहभागी होत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.