आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या दुकानदारांना तीन महिने प्लास्टिक पिशवी वापराची मुभा; पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरसकट प्लास्टिक बंदीला छोट्या व्यापाऱ्यांनी केलेल्या विरोधानंतर अवघ्या पाच दिवसांतच राज्य सरकार नमले आहे. पुढील तीन महिने छोटे आणि किराणा दुकानदार ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिकमध्येच वस्तू बांधून देऊ शकतील. तथापि, ग्राहकांना प्लास्टिक कॅरीबॅग वापरण्यासाठी बंदी कायम असेल. ब्रँडेड रिटेलर्सना सरकारने आधीच तीन महिन्यांची मुदत दिलेली आहे. नव्या घोषणेमुळे ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे आता किरकोळ दुकानदारांबरोबरच ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या नव्या दुरुस्तीबाबत गुरुवारी परिपत्रक काढण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी रात्री सांगितले. राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली होती. 


मंत्री रामदास कदम म्हणाले, छोट्या दुकानदारांच्या संघटनांनी पुढील तीन महिन्यांत प्लास्टिक बॅगचे रिसायकलिंग करू तसेच ग्राहकांकडून प्रति प्लास्टिक पिशवी ५० पैशांत पुन्हा विकत घेऊ, असा प्रस्ताव सादर केला. तो आम्ही मान्य केला आहे. दरम्यान, प्लास्टिक बंदीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो विरोध करत आहे, तो व्यापारी हिताचा असून सुपारीबाज राजकारणाचा भाग आहे, असा आरोप कदम यांनी केला. 


या अटींवर प्लास्टिक बॅग वापरास परवानगी 
1 प्लास्टिक उत्पादकांनी प्लास्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी. 
2 पॅकेजिंगवर संबंधित उत्पादकाचे नाव, पत्ता, कोड तसेच प्लास्टिकचा दर्जा छापण्यात यावा. 
3 प्लास्टिक उत्पादकांनी रिसायकल प्लांट्स आणि कलेक्शन सेंटर्स आदींची उभारणी करावी. 

 

प्लास्टिक बंदीच्या नियमांत असा झाला बदल 
प्लास्टिक बंदी अंमलबजावणीवरील तज्ज्ञ समितीने रिटेल पॅकेजिंगसंदर्भात बंदीच्या नियमात सुधारणा करण्याची सूचना केली होती. याबाबत बुधवारी सीएमओचे सचिव प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण विभागचे सचिव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण मंत्र्यांची बैठक झाली. तसेच छोट्या दुकानदारांच्या संघटनांशी सरकारची बोलणी झाली होती. यानंतर प्लास्टिक बंदी शिथिल करण्याचा निर्णय झाला. सायंकाळपर्यंत प्रस्ताव झाला. रात्री ९ वाजता पर्यावरण सचिवांची सही झाली. गुरुवारी सकाळी पर्यावरण मंत्र्यांची सही होईल. सायंकाळपर्यंत नवी अधिसूचना जारी करण्यात येईल. 


दुजाभावामुळे व्यापारी संतप्त 
ब्रँडेड कंपन्यांच्या किरकोळ उत्पादनांच्या पॅकेजिंगला बंदी नाही. मात्र किरकोळ मालाच्या पॅकेजिंगला बंदी होती. त्याविरोधात व्यापारी न्यायालयात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही अधिसूचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अटीही घातल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. 
 

...तर किलोची मर्यादा नाही 
नव्या नियमानुसार किरकोळ पॅकेजिंगसाठी ५० मायक्राॅनपेक्षा अधिक जाड व उत्पादकाचा कोड छापलेले प्लास्टिक वापरता येईल. हे नियम पाळल्यास सामान पॅकिंगसाठी किलोची मर्यादा असणार नाही, असेही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने 'दिव्य मराठी'ला सांगितले. 


राज्यभरात उद््भवले होते वाद 
मुंबईत किरकोळ दुकानदार आणि मुंबई महापालिका प्लास्टिकविरोधी पथक यांच्यात जोराचे वाद उद््भवले होते. चीरा बाजार, ठाकुरद्वारा येथे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेड युनियनने दुकाने बंद ठेवून बंदीचा निषेध केला होता. राज्यभरातही अनेक ठिकाणी असेच वाद उद््भवले होते. 

बातम्या आणखी आहेत...