आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: यूपीए-3 चे नेपथ्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९९-२००३ या काळात उदारीकरण-खासगीकरण-जागतिकीकरण धोरणे अटलबिहारी वाजपेयी सरकारला योग्य रीतीने रेटता आली नाहीत. त्यात भाजपची कृषी क्षेत्रावर आघात करणारी धोरणे त्यांच्या इंडिया शायनिंग कॅम्पेनच्या मुळावर आली आणि २००४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ १३८  तर काँग्रेसला १४५ जागा मिळाल्या. दोघांमध्ये फक्त सात जागांचा फरक होता.

 

भाजपच्या या अनपेक्षित पराभवाची मीमांसा करताना त्या वेळी भाजपचे चाणक्य समजले जाणारे प्रमोद महाजन यांनी असे वक्तव्य केले होते की, ‘एनडीए आघाडी जशी भाजपने बांधली होती तसाच प्रयोग काँग्रेसने केल्याने भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.’ महाजन यांच्या म्हणण्यात तथ्य होते, कारण काँग्रेसने आंध्र प्रदेशात तेलंगण राष्ट्र समिती, तामिळनाडूत द्रमुक, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल व रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी, महाराष्ट्रातील शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी निवडणूकपूर्व युती केली.

 

या सर्व प्रादेशिक पक्षांनी विविध राज्यात भाजपच्या जागा खाल्ल्या व त्यांचे यश आपसूकच काँग्रेसच्या पारड्यात पडले. भाजपला त्या वेळी खरा फटका बसला तो आंध्र प्रदेश व तामिळनाडूत. या दोन राज्यांतील ६० जागा ते हरले. एमडीएमकेच्या वायको यांनी वाजपेयी यांना ठेंगा दाखवला. डाव्यांनी केरळमध्ये काँग्रेस आघाडीला धूळ चारली. माकप व भाकपच्या जागा १९९९च्या तुलनेत ३७ वरून ५३ एवढ्या वाढल्या. भाजपला गुजरात व उत्तर प्रदेशात फारशी चमक दाखवता आली नाही. काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी युती करताना आपल्या बऱ्याच जागांवर पाणी सोडले. बिहारमध्ये त्यांनी ४० जागांपैकी ४ जागा लढवल्या.

 

भाजपची मतांची टक्केवारी १९९९च्या तुलनेत २.३ टक्क्यांनी कमी होऊन २१.५ टक्के झाली, तर काँग्रेसची टक्केवारी २८.३ टक्क्याहून २६.३ टक्के अशी खाली आली. काँग्रेसला १९९९मध्ये ११४ जागा होत्या, त्या १४५ झाल्या. काँग्रेसच्या जागांमधील ही वाढ प्रादेशिक पक्षांमुळे झाली. काँग्रेसची ही रणनीती भाजपला चकित करणारी ठरली.  


काल कर्नाटकात जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात २००४च्या काळातले बरेचसे नेते होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकप नेते सीताराम येचुरी, बसपच्या अध्यक्ष मायावती, राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, भाकपचे नेते डी. राजा, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, आपचे केजरीवाल असे ११ विविध पक्षांचे नेते होते.

 

या शपथविधीदरम्यान मंचावरील सर्वच नेत्यांमधील खेळीमेळीचे दृश्य पाहता २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर यूपीए-३ आघाडी तयार झाली, असे म्हणता येईल. भाजपकडे उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमधल्या लोकसभा जागा अधिक आहेत. या एकेका राज्यात प्रादेशिक पक्षांच्या साहाय्याने भाजपच्या जागा कमी करता येतील, अशी रणनीती सुरू आहे. कुमारस्वामींच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या ११ पक्षांकडे सध्या १३२ लोकसभा जागा आहेत, जर २०१९मध्ये या सर्व पक्षांनी आघाडी करून निवडणुका लढवल्या व त्यांच्या मतांमध्ये विभागणी न झाल्यास भाजपला मोठे नुकसान सोसावे लागू शकते.

 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरातमध्ये काँग्रेस व अन्य पक्षांना अक्षरश: धूळ चारली होती. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या जागा सोडून जवळपास सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. हे यश २०१९मध्ये कायम राहील याची शक्यता नाही. कारण गेल्या चार वर्षांत भाजप २८२ जागांवरून २७४ जागांवर आला आहे आणि उत्तर प्रदेश-बिहारमध्ये सपा, बसप, काँग्रेस, राजद यांच्यामध्ये युती झाल्यास, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, कर्नाटकात जेडीएसबरोबर युती झाल्यास भाजपचा आकडा २७४च्या खाली जाऊ शकतो.

 

या सर्व शक्यता २००४चे यश लक्षात घेऊन आता काँग्रेस यूपीए-३चा फॉर्म्युला वापरू शकते. या घडीला येनेकेन प्रकारे भाजपला रोखणे एवढेच उद्दिष्ट काँग्रेस व विरोधी पक्षांपुढे आहे. त्यांच्यापुढे आघाडी करणे हाच पर्याय आहे. कर्नाटक निवडणुकांत भाजपला अस्मान दाखवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसशी युती करत भाजप विरोधक प्रादेशिक पक्षांशी आपली मैत्री होऊ शकते हा संदेश दिला होता. या संदेशाचे स्वागत या प्रादेशिक नेत्यांनी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहून केले. यूपीए-३ ची घोषणा फार दूर नाही.

 

सुजय शास्त्री
डेप्युटी न्यूज एडिटर, मुंबई

बातम्या आणखी आहेत...