आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मोठा गाजावाजा करून सुरू केलेली पंतप्रधान उज्ज्वला योजना फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. इतर योजनांप्रमाणेच सरकारची ही योजनासुध्दा फसवी असल्याचे वास्तव समोर आणण्यासाठी राष्ट्रवादीने एक ध्वनिचित्रफितच तयार केली आहे. याशिवाय लवकरच प्रत्येक जिल्ह्यात या योजनेविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे वाघ यांनी जाहीर केले.
ग्रामीण भागातील महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका करण्यासाठी मोठा गाजावाजा करत पंतप्रधान उज्ज्वला योजना सादर केली गेली. मात्र, या योजनेचा फायदा होण्याऐवजी तोटाच होत असून गॅस सिलेंडर मिळवण्यात अनंत अडचणी असल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा चुलीचाच मार्ग अवलंबला असल्याचा दावा वाघ यांनी केला. या योजनेचे वास्तव मांडण्यासाठी राष्ट्रवादीने राज्यातील सहा जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधला असून या योजनेबाबतच्या अडचणी दाखवणारी एक ध्वनिचित्रफितच राष्ट्रवादीच्या वतीने तयार करण्यात आली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी गॅस सिलेंडर जोडणी केली, त्या कुटुंबांना आता रेशनवर मिळणारे रॉकेल बंद झाले आहे. तसेच ही जोडणी घेण्यासाठी दोन ते आठ हजारांपर्यंत लाच घेतली जाते. याशिवाय सिलेंडर संपल्यानंतर भरलेला सिलेंडर आणण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना सिलेंडरच्या किंमती व्यतिरिक्त दोनशे ते अडीचशे रुपये प्रवास खर्चासाठी स्वत:च्या खिशातून खर्चावे लागतात. त्यामुळे कंटाळून अनेक कुटुंबांनी पुन्हा एकदा चुलीचा वापरच सुरू केल्याचा दावा वाघ यांनी केला आहे. या सर्व बाबीं आम्ही ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून उघड केल्या असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या आरोपानंतर भाजप सरकारने अद्याप काहीही वक्तव्य केले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या मुद्यावर वातावरण तापण्याची शक्यता आहे.
फसवी योजना
पाच कोटी परिवारांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून येत्या काळात आणि आणखी आठ कोटी परिवारांना या योजनेचा लाभ होणार असल्याचा दावा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मात्र वास्तव वेगळेच असून लाभार्थीच ही योजना फसवी असल्याचे सांगत असल्याचा टोलाही वाघ यांनी लगावला. सरकारच्या इतर योजनांसारखीच ही योजनाही फसवी असून सरकारच्या फसव्या घोषणांच्या धुरामध्ये लोकांची घुसमट होत आहे. त्यामुळे राज्याच्या इतर जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेऊन ही बाब आपण पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.