आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम महाराष्ट्राचे विकासाचे मॉडेल विदर्भाच्या माथी; केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजना बिनकामाच्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पश्चिम महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण राज्याच्या कृषी विकासाच्या योजना बनवल्या जातात. त्यांचा विदर्भातल्या शेतीला, शेतकऱ्यांना त्या योजनांचा काही लाभ होत नाही. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांच्या कृषी विकासाच्या योजना पूर्णपणे निरुपयोगाच्या अाहेत. त्यामुळे विदर्भात कृषी संकट अधिक गडद झाले असून विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा उत्तरोत्तर वाढत आहे, असा निष्कर्ष मुंबई विद्यापीठातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यास दौऱ्यातील पाहणीअंती काढला आहे.  


मुंबई विद्यापीठात राजीव गांधी समकालीन अभ्यास केंद्राच्या वतीने सामाजिक शास्त्राचा हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमाच्या ३० विद्यार्थ्यांनी बुलडाणा जिल्ह्यात अभ्यास दौरा केला. मेहकर, जळगाव-जामोद, शेगाव आणि मोताळा या चार तालुक्यांत या विद्यार्थ्यांनी तेथील महिला, शेतमजूर, ग्रामअधिकारी, शेतकरी, विद्यार्थी यांची मते जाणून घेतली. यामध्ये हजारांपेक्षा अधिक मुलाखती घेण्यात आल्या आहेत. याकामी विकास सहयोग प्रतिष्ठान या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने मदत केली. पश्चिम महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत शेती विकासाच्या योजना हाती घेतल्या. त्यांचा विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांना काही उपयोग झाला नाही. त्यामुळे विदर्भातील भौगोलिक एकक लक्षात घेऊन कृषी विकासाच्या योजना राबवल्या पाहिजेत. तसेच केंद्र आणि राज्याच्या सध्याच्या योजना कुचकामी आहेत, असेही या विद्यार्थ्यांना हजारो गावकऱ्यांच्या मुलाखतीमधून आढळून आल्याचे त्यांनी आपल्या शोधनिबंधात मांडले आहे.  


शेतकरी आत्महत्यांची कारणे
शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध या संशोधक विद्यार्थ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. हवामानातील बदल, खोल गेलेली पाणीपातळी, शेती निविष्ठांचा वाढता खर्च, शेतमालास भाव नसणे, कर्जबाजारीपणा, खासगी सावकाराचा जाच, कामगाराची अनुपलब्धता, आरोग्यावरचा वाढता खर्च, जोडधंद्याचा अभाव (सामाजिक गतिशीलता नसणे ) अशी दहा कारणे शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी अाहेत, असे या अहवालातून समोर आले आहे. 


हजारो मुलाखती, प्रश्नावलींचा आधार
विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. म्हणून अभ्यास दौऱ्यासाठी आम्ही बुलडाणा जिल्ह्या निवडला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या एक आठवड्याच्या अभ्यास दौऱ्यात ३० विद्यार्थी सहभागी होते. या विद्यार्थ्यांनी हजारो मुलाखती घेतल्या. त्यातून निघालेल्या निष्कर्षांना मौखिक इतिहासाचे मोल अाहे, असे या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक व शेतकरी आत्महत्यांवर संशोधन केलेले मुंबई विद्यापीठाचे सहायक प्रा. प्रवीण घुन्नर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...