मुंबई - आदर्श घोटाळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आरोपी करा, अशी मागणी करणाºया याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.
न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि पी. डी. कोडे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी याचिका दाखल केली होती. आदर्श घोटाळ्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही सहभाग असल्याचा आरोप करून त्यांना आरोपी करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी वाटेगावकर यांनी याचिकेत केली होती. मात्र, याबाबतची सुनावणी ‘आमच्यासमोर नको’ असे सांगत कोणत्याही कारणाविना ही याचिका न्यायालयाने फेटाळली.
आॅक्टोबर 2013 मध्ये सीबीआयने केलेल्या चौकशीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी महसूल मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना घोटाळ्यातून क्लीन चिट दिली होती. केवळ संबंधित विभागाच्या अधिकाºयांवरच ठपका ठेवण्यात आला होता.