आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस वाचवण्यासाठीच अशोकरावांना अभय, मराठवाड्यात नेता नसल्याने श्रेष्ठींचा खटाटोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्यपालांनी नाकारलेली परवानगी म्हणजे मराठवाड्यातील काँग्रेस वाचवण्यासाठी पक्षश्रेष्ठींची व्यूहरचना असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणाने मुख्यमंत्रिपद गमावून चव्हाण विजनवासात गेल्यानंतर बीडच्या रजनी पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देऊन मराठवाड्यातील काँग्रेस जिवंत ठेवण्याचा प्रयत्न झाला; पण त्याला फारसे यश न मिळाल्यामुळे दिल्लीने पुन्हा अशोक चव्हाणांना कार्यरत करण्याचे ठरवले आहे.
अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राज्याची सूत्रे देण्यात आली आणि तेव्हापासून अशोकराव राजकीय विजनवासात गेले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते पुन्हा कार्यरत झाले आहेत. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसला यश मिळवून दिले. त्याच वेळी पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ झाली असली, तरी त्याचा काँग्रेसला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने कितपत फायदा होईल, या प्रश्नाचे उत्तर मात्र पक्षश्रेष्ठींना सोडवता आलेले नाही. त्यामुळे आतापासून अशोकरावांना कार्यरत करून निवडणुकांची तयारी करण्यासाठी काँग्रेसने उचलेले हे पाऊल असल्याचे बोलले जाते.