आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aahir, Ashok Chavhan, Supriya Sule Are Not Clear Calculation

राज्यमंत्री अहिर, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळेंच्या हिशेबातही त्रुटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अापल्या निवडणुकीत पक्षाने दिलेल्या नोंदीपेक्षा जास्त पक्षनिधी मिळाल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या हिशेबात म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील हे नेतेही अडचणीत आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, पूनम महाजन, लातूरचे खासदार सुनील गायकवाड, दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांच्या खर्चाच्या निवेदनातही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. राज्यातील ५ भाजप खासदारांचा अपवाद वगळता इतर सर्वच खासदारांची बनबाबनवी ‘एडीआर’च्या अहवालात उघड
झाली अाहे.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या खर्चाच्या निवेदनांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून ६५ लाख मिळाल्याचे आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, तर त्यांच्या पक्षाने दिलेल्या निवेदनात मात्र चव्हाण यांना केवळ ४० लाखच निधी दिल्याचे आयोगाकडे दिलेल्या माहितीत स्पष्ट केले अाहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही असाच घोळ आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी अापल्याला निवडणुकीत ६० लाख पक्षनिधी दिल्याचे सांगितले अाहे. पक्षाने मात्र त्यांना ५० लाख दिल्याची माहिती दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढताना पक्षाने आपल्याला ६४ लाख ७० हजार दिल्याचे नमूद केले असले तरी राष्ट्रवादीने त्यांना ५० लाखांचा एकरकमी निधी दिल्याचे कळवले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांच्या हिशेबातील बनवाबनवी समाेर अाली असून त्यांनी आयोगाकडे सादर केलेल्या खर्चाच्या निवेदनाच्या सत्यतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शिवसेनेच्या नेत्यांचीही पक्षाच्या नावावर ‘पावती’
शिवसेना पक्ष आणि त्यांचे १७ विजयी उमेदवार यांचा अभ्यास केल्यानंतर तीन खासदारांच्या खर्चाबाबतच्या निवेदनात घोळ आढळले आहेत. बुलडाण्याचे प्रतापराव जाधव, मावळचे श्रीरंग बारणे, शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षाने एक रुपयाही निधी दिला नसताना त्यांनी आपल्या निवेदनात मात्र एकूण २५ लाख मिळाल्याचे नमूद केले अाहे.

भाजपच्या खासदारांचा घोळात घोळ
राज्यातून भाजपचे २३ उमेदवार विजयी झाले आहेत. यापैकी ५ खासदारांचा अपवाद वगळता उर्वरित १८ खासदारांच्या खर्चाचे निवेदन आणि भाजपचे निवेदन यांची तुलना केली असता पक्षनिधीच्या आकड्यात घोळ आहे. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, प्रमोद महाजन यांची कन्या आणि मुंबई उत्तर-मध्यच्या खासदार पूनम महाजन, मुंबई उत्तरचे खासदार गोपाळ शेट्टी, जळगावचे खासदार अशोक पाटील, भंडारा-गोंदियाचे नानाभाऊ पटोले, गडचिरोली-चिमूरचे अशोक नेते यांनी पक्षाने दिलेल्या एकरकमी निधीपेक्षा जादा निधी मिळाल्याचा दावा केला आहे. या सर्वांची एकत्रित जादा रक्कम ७२ लाखांहून अधिक असल्याने या पैशाचा हिशेब या खासदारांना द्यावा लागू शकतो. लातूरचे खासदार सुनील गायकवाड, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पालघरचे चिंतामण वनगा यांना भाजपने एक रुपयाही पक्षनिधी म्हणून दिलेला नाही. मात्र, या सर्वांनी मिळून आपल्याला एकूण १ कोटी २६ लाख रुपये पक्षाकडून मिळाल्याचे आयोगाला सांगितले आहे. खासदार किरीट सोमय्या आणि सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी वा लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निधीपेक्षा कमी निधी मिळाल्याचे निवडणूक आयोगाला कळवले आहे.