आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरंदरच्या विमानतळाला संभाजीराजेंचे नाव, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या सर्वसाधारण बैठकीनंतर ते बाेलत हाेते. राज्यातील नागपूर, कोल्हापूर, सोलापूर येथील विमानतळाच्या कामांना गती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष विश्वास पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव शामलाल गोयल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी आदी बैठकीला उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर जमीन संपादित केली जाईल. विमानतळाच्या जागेसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सहा ठिकाणी पाहणी केली व पुरंदर येथील जागेला पसंती दर्शविली.

यामुळे पुणे येथे नवीन विमानतळाची ३० वर्षांपासूनची मागणीही यानिमित्ताने पूर्ण होत आहे. पुरंदर हे छत्रपती संभाजी राजे यांचे जन्मस्थान आहे. या ऐतिहासिक स्थळापासून विमानतळाची जागा केवळ १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे या विमानतळाला संभाजी राजे यांचे नाव देण्याचे निश्चित केले आहे’ , असे मुख्यमंत्री म्हणाले. या विमानतळाला २४०० हेक्टर जागा लागणार असून चार किलोमीटरच्या दोन धावपट्ट्या बनविणार असल्याचे ते म्हणाले. या विमानतळामुळे येथील उद्योग व शेती व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...