मुंबई / नवी दिल्ली - असहिष्णुतेच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आणि समर्थकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या अभिनेता आमिर खानने बुधवारी एकपानी निवेदन जारी करून
आपली भूमिका स्पष्ट केली. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत. मी किंवा माझ्या पत्नीचा देश सोडून जाण्याचा कोणताही इरादा नाही. मी भारतीय असल्याचा मला अभिमानच आहे आणि माझ्या देशभक्तीसाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे आमिरने म्हटले आहे.
त्याचे शब्दश: निवेदन -
मी किंवा माझी पत्नी किरणचा देश सोडून जाण्याचा कोणताही इरादा नाही. आम्ही तसे कधीही केले नाही आणि भविष्यातही करणार नाही, हे पहिल्यांदा मला स्पष्ट केले पाहिजे. माझ्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांनी एक तर माझी मुलाखत पाहिलेली नाही किंवा मी जे काही म्हटले आहे त्याचा ते हेतुत: विपर्यास करत आहेत. भारत हा माझा देश आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या देशात जन्म घेतल्याबद्दल आणि तेथेच वास्तव्य करत असल्याबद्दल मला स्वत:ला नशीबवान समजतो.
दुसरे असे की, माझ्या मुलाखतीत मी जे काही म्हटले आहे, त्यावर मी ठाम आहे. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि माझ्या देशभक्तीसाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे मी जे लोक मला राष्ट्रद्रोही ठरवत आहेत, त्या सर्वांना सांगू इच्छितो. मी माझ्या मनातले बोलल्यामुळे जे लोक माझ्यावर अर्वाच्य भाषेत टीका करत आहेत, त्यामुळे माझे म्हणणे खरे ठरत आहे, हे मला दुर्दैवाने सांगावे वाटते. जे लोक माझ्या बाजूने उभे राहिलेत त्यांचा मी आभारी आहे. आपल्या सुंदर व अद्भुत देशाचे चरित्र आपणाला सुरक्षित ठेवायचे आहे. देशाची एकता, अखंडता, विविधता, संस्कृती, इतिहास, अनेकतावाद, सहिष्णुता याचे आपण रक्षण करूया. शेवटी मी रवींद्रनाथ टागोरांची कविता उद्धृत करू इच्छतो. ही कविता नाही तर प्रार्थना आहे-
‘ जेथे भराऱ्या घेई भयमुक्त मन
आणि अभिमानाने ताठ असतील माना
जेथे ज्ञान सर्वांसाठी मुक्त आणि विनाशर्त
जेथे घरांच्या उंबरठ्यासारख्या छोट्या सीमांनी विश्व विभागलेले नसेल
जेथे सत्याच्या खोलातून आपसूक
बाहेर आलेले प्रत्येक विधान
जेथे अथक प्रयत्नांच्या दिशेने बाहू फैलावलेले आहेत
जेथे योग्य विचारांचा प्रवाह मुर्दाड
सवयींनी अस्पष्ट केलेला नाही
जेथे तन-मन नव्या विचारांचा शोध
घेईल आणि त्यावर अंमल करेल
हे भगवान, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात
माझ्या देशाचा नवा उष:काल होवो...
पुढील स्लाइड्सवर वाचा, देश मालकीचा असल्याच्या तोऱ्यात बोलू नका : पवार