आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांवरील टीकेवरून कार्यकर्ते संतप्त,राष्‍ट्रवादीने फोडले ‘आप’चे कार्यालय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आम आदमी पार्टीच्या (आप) समन्वयक अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऊर्जा खात्याने 22 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ‘आप’चे अंधेरी येथील कार्यालय फोडले. ‘आप’च्या टीकेला तोडफोडीने प्रत्युत्तर देणा-या कार्यकर्त्यांची ही हातघाई राष्‍ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना मात्र रुचली नाही. पक्षाने विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षाला सहा वर्षांसाठी तडकाफडकी निलंबित केले.
शनिवारी दुपारी 20-25 जणांचा एका जमाव अंधेरी येथील ‘आप’च्या कार्यालयावर चालून गेला. कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पोस्टरवर शाई फेकली आणि कार्यालयाची तोडफोड सुरू केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुमारे 25 जणांना अटक केली.
अमोल मातेले निलंबित : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली.
घटनेची माहिती नाही - मलिक : राष्‍ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी घडलेल्या प्रकाराबद्दल कानावर हात ठेवले. आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचे सांगत त्यांनी तोडफोडीचा विषय टाळला.
हल्ल्याचे कारण काय?
अजित पवार यांच्या ऊर्जा खात्याने 22 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. मुंबैकरांना यामुळे महागडे वीज बिल भरावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावरून राष्‍ट्रवादी संतप्त झाली आहे.
अंजली दमानिया समन्वयक, आप
आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला करणा-यांवर कठोर कारवाई करा.
जितेंद्र आव्हाड, कार्याध्यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस
तोडफोड ही राष्ट्रवादीची संस्कृती नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.
अमोल मातेले विद्यार्थी नेते
आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले. ‘आप’च्या कार्यालयाचे एक पैशाचेही नुकसान केले नाही.
मयंक गांधी अटकेत
‘आप’ कार्यालयावरील हल्ल्यानंतर मयंक गांधी यांनी अंधेरीत राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर झाडू मारण्याचे ठरवले. काही कार्यकर्त्यांसमवेत कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर झाडू मारणारच असा पवित्रा घेतल्याने आगामी एक-दोन दिवस राष्ट्रवादी आणि ‘आप’मध्ये सामना चांगलाच रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.