आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोटाळ्यांचे सावट : ‘स्वच्छ सरकार’ला भ्रष्टाचाराची बाधा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते, राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नऊ वर्षाच्या कार्यकाळात नियम व कायदे धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने गाळे विकले, समितीच्या कराचे पैसे हडप केल्याने बाजार समितीचे सुमारे पाचशे कोटींचे उत्पन्न बुडवून ते लाटल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन-शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. खोतकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीमामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आप’ने ही माहिती माहिती अधिकारात जमा केल्याचे त्यांनी सांगितले. खोतकर यांची बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या पद्धतीची माहिती देणारा व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला. अर्जून खोतकर बाजार समितीचे सभापती आहेत. मात्र तेथील सर्व व्यवहार त्यांचे बंधू संजय पाहतात. तसेच खोतकर कुटुंबियांचे बाजार समितीतील दररोजचे कलेक्शन ५ लाख असल्याचा दावा जालना येथील ‘आप’चे नेते संजय फुलारी यांनी यावेळी केला.

असे केले घोटाळे
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे तांत्रिक सल्लागार अजित छाबडा आणि आर्थिक सल्लागार नितीन चेचानी हे कंत्राटदार असून बाजार समितीचे गाळाधारकही आहेत. बाजार समितीमधील अनियमीतेत खोतकर यांच्याइतकाच या दोघांचाही हात असल्याचा आरोप मेनन यांनी केला.

लेखापरीक्षणातील आक्षेप
अ ) गतवर्षीच्या लेखापरीक्षण अहवालानुसार बाजार समितीचे उत्पन्न रु. ८०,५१९,६६७.०६ इतके होते तर खर्च मात्र रु. ९६,४८२,६५७ इतका होता म्हणजे एकूण आर्थिक तूट रु. १६,३४३,५८९.४९
ब ) व्यापारी गाळा विक्री करताना ठरलेली रक्कम बाजार समितीने गाळा धारकांकडून वसूल केली नाही. 39 असे गाळाधारक आहेत ज्यांचे पैसे अजूनही बाकी आहेत.
क) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाडेपट्टीचे रु. १२,२११,०४१.०० आणि मालमत्ता भाडे रु. १,६१८,०३३.८५ गाळाधारकांकडे थकीत आहे.
ड) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची एकूण मिळकत रु. ११,४६२,८६० आहे परंतु ही रक्कम वसूल करण्यासाठी बाजार समिती कुठलेही पाऊल उचलत नाही.
फ) लेखापरीक्षांतील नोंदी स्पष्ट करतात की जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मिळकत-खर्चाच्या रेजिस्टर मध्ये कोरी पाने आहेत आणि खर्चार्चे वाउचर कोरे आहेत. चेकचे कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध नाही.
ह) बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येत नाही.

५०० कोटींचा घोटाळा कसा?
कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे हे शेतकरी अथवा शेतमाल व्यापारी यांना वाजवी दारात भाडेतत्वावर देणे अपेक्षित असते. खोतकर यांनी २० ते ७० लाखाचे गाळे केवळ ३ ते पाच लाखात विकल्याचे दाखवले आणि वरचे पैसे टेबलाखालून घेतले. अशा प्रकारे १५०० गाळ्यांची किंमत ६०० कोटी असताना समितीला ७५ कोटी मिळाले. वरचे ५२५ कोटीची रक्कम अर्जुन खोतकर आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी लंपास केली असा दावा मेनन यांनी केला.

उद्धव यांना आवाहन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बबन घोलप आणि सुरेश जैन यांचे घोटाळे उघड होताच त्यांचा तडकापडकी राजीनामा घेतला होता, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत असताना शेतकरीविरोधी काम करणाऱ्या खोतकर यांचा राजीनामा घेण्याची धमक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवावी, असे आवाहन ‘आप’ने यावेळी केले.

खोतकरांनी जालना बाजार समितीस ५०० कोटींना बुडवले
जालना शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधराशे गाळे आहेत. त्यातील खोतकर यांच्या जवळच्या ४० व्यक्तींच्या नावे २५० गाळे आहेत. खोतकर गेल्या ९ वर्षांपासून बाजार समितीचे सभापती आहेत. बहुतांश गाळे कृषी संबंधित व्यापारासाठी न वापरता कपडे, ऑटोमोबाईल व अन्य व्यापारासाठी विकण्यात आले अाहेत. जुना मोंढ्यातही शेत माल विक्री गाळ्याच्या ठिकाणी कपड्यांची भव्य दालने खोतकर यांचे बालमित्र विनोद बजाज आणि नाथानी कुटुंबीयांनी उभी केली आहेत. तसेच खोतकर यांचे मामा तुळाराम वाडेकर यांचे गाड्यांचे शोरुम नियम डावलून उभारल्याचा दावा मेनन यांनी केला.

हत्येच्या आरोपांचे दाखले
अर्जुन खोतकर यांच्यावर नगरसेविका संगीता खिल्लारे यांच्या हत्येचा आरोप असून त्यांचे बंधू संजय यांच्यावर संघाचे कार्यकर्ते कैलास गौड यांच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. मात्र पोलिस तपास ठप्प असल्याचे दाखले मेनन यांनी दिले.

खोतकरांचा राजीनामा घ्या
अर्जुन खोतकरांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. जालना बाजार समिती सभापती पदावरून पदच्युत करावे, अशी मागणी ‘आप’ने केली. याबाबत लोकायुक्त, मुख्यमंत्री, एसीबी व राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचेही मेनन म्हणाल्या.
पुढे वाचा, मंत्री सुभाष देशमुखांची कंपनी लोकमंगलवर सेबीचा ठपका...
बातम्या आणखी आहेत...