आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेच्या पराभावर ‘आप’चे आज चिंतन, राज्यातील सर्वच उमेदवारांची झाडाझडती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यात खाते उघडू न शकलेल्या आणि मतांच्या टक्केवारीत ‘बसप’, ‘स्वाभिमानी’ पेक्षा पिछाडीवर राहिलेल्या आम आदमी पक्षाने पराभवाची चिकित्सा करण्यासाठी सोमवारी आत्मचिंतन बैठक बोलावली आहे. या बैठकीस राज्यातील सर्व 48 लोकसभा उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
‘आप’ने लोकसभेच्या राज्यातील सर्व जागा लढवल्या होत्या. मात्र वामनराव चटप (चंद्रपूर) वगळता 47 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. मतांच्या टक्केवारीतही बसप (2.6%) , स्वाभिमानी (2.3) पेक्षा आप (2.2%) पिछाडीवर आहे. पराभवाच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ने सोमवारी चिंतन बैठक बोलवली आहे. या बैठकीस राज्य कार्यकारणीचे सर्व सदस्य उपस्थित असतील. दिल्लीतून कोणीही वरिष्ठ नेते येणार नाहीत. सुभाष वारे (पुणे) आणि मयंक गांधी (मुंबई) या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत ‘आप’ उमेदवारांना पक्षाकडून मदत मिळाली नाही. स्टार नेतेही प्रचारासाठी मुंबई वगळता उपलब्ध झाले नाहीत. त्याचे पडसाद बैठकीत उमटू शकतात.
राजीनाम्याचे लोण
‘आप’च्या महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीत 16 सदस्य आहेत. त्यातील अ‍ॅड. अहमद शकील यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला.
विधानसभेला पुन्हा प्रयोग
‘आप’ने लोकसभेला राज्यात 48 उमेदवार दिले होते. त्यातील केवळ 7 उमेदवार तिसर्‍या क्रमांकाची मते मिळवू शकले. चांगली कामगिरी करणार्‍या उमेदवारांना विधानसभेचे तिकीट देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे ‘आप’च्या राज्य सचिव प्रीती मेनन-शर्मा यांनी सांगितले.
‘आप’ जमिनीवर
लोकसभेला पक्षाने सर्व जागा लढवल्या होत्या. विधानसभेला अशी चूक टाळण्यात येईल. जिथे जनाधार आहे. तिथेच उमेदवार देण्याचा विचार असल्याची माहिती ‘आप’चे नेते संजीव साने यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.