आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\'च्या बैठकीवर हकालपट्टीचे सावट, कार्यकारिणी सदस्य सोडचिठ्ठीच्या तयारीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्यासह अन्य चार नेत्यांच्या आम आदमी पक्षातून झालेल्या हकालपट्टीचे पडसाद येत्या २४ एप्रिल रोजी पुण्यात होणा-या पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. या बैठकीत कार्यकारिणीचे काही सदस्य "आप'ला सोडचिठ्ठी देऊन बंडखोर गटाच्या स्वराज्य अभियानात सामील होण्याची दाट शक्यता आहे.

योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, अजित झा आणि आनंद कुमार यांची सोमवारी आपमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे पक्षाच्या राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने तातडीने राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.

शुक्रवारी पुण्यात पक्ष कार्यालयात ही बैठक होत आहे. राज्य संयोजक सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणा-या बैठकीला राज्य कार्यकारिणीचे सर्व १५ सदस्य हजर असतील. मराठवाडा व विदर्भात मे महिन्यात आपकडून शेतकरी संवाद अभियान तसेच भ्रष्टाचारिवरोधी हेल्पलाइनही सुरू केली जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी बैठक बोलावली असल्याचे राज्य संयोजक सुभाष वारे यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले.

दिल्लीत गेला महिनाभर पक्षात जी साठमारी चालू आहे. तो विषय शुक्रवारच्या बैठकीच्या अजेंड्यावर नाही. मात्र, इतक्या गंभीर विषयाला कार्यकारिणी बगल नाही देऊ शकणार, असे सांगून यादव, भूषण यांच्या हकालपट्टीवर बैठकीत चर्चा होणारच, असे पक्षाच्या सचिव आभा मुळे यांनी सांगितले. सुभाष वारे (पुणे), आभा मुळे (पुणे), मीना कर्णिक (मुंबई), देवेंद्र वानखेडे (विदर्भ), सुभाष लोमटे (मराठवाडा), संजय परमार (मुंबई), रियाज पठाण (कोकण) आणि मयांक गांधी (मुंबई) राज्य कार्यकारिणीत आहेत. या वेळी अरविंद केजरीवाल आणि योगेंद्र यादव यांच्यापैकी कुणासोबत जाणार हे शुक्रवारच्या पुण्यातील बैठकीत स्पष्ट होणार आहे.

स्वराज्य संवादात सामील होणार
योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांनी उत्तर भारतात ‘स्वराज्य संवाद’ अभियान सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारणीचे काही सदस्य ‘आप’ला सोडचिठ्ठी देऊन या अभियानात सामील होण्याचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत जाहीर करतील, अशी शक्यता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने वर्तवली.