आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाच ‘आप’चे बलस्थान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आजच्या निवडणुकांमध्ये सोशल नेटवर्किंग हा परवलीचा शब्द बनलाय. या पद्धतीचा प्रचार तर ‘आम आदमी पक्षा’चे बलस्थान आहे. दिल्लीत याच सोशल मीडियाने ‘आप’ला सत्तेपर्यंत पोहोचवले. आता लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातही या पक्षाने जिल्हावार फेसबुक पेज बनवले असून प्रत्येक ‘पेज’ला प्रतिदिन हजारावर चाहते जोडले जात आहेत.

‘आप’ हा स्वयंसेवकांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच या पक्षाची वॉर रूमसुद्धा स्वयंसेवकांच्या हाती आहे. अंधेरीमधील प्रदेश कार्यालयात सज्ज असलेल्या या सोशल मीडिया कक्षाची जबाबदारी पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा यांच्यावर आहे.

‘आप’चे देशभरात 600 पेजेस आहेत. राज्यात महाराष्ट्र आणि मुंबई मुख्य पेजेस असून 35 जिल्ह्याचे स्वतंत्र पेजेसही आहेत. प्रत्येक पेज सांभाळण्यासाठी किमान चार जण आहेत. विशेष म्हणजे या पक्षाचे सोशल नेटवर्किंगचे काम करणारी टीम कोणत्याही मोबदल्याविना काम करते.

‘आप’ स्वतंत्र विचार देणारी पार्टी आहे. फेसबुकवर लाइक, शेअर आणि कॉमेंटची सोय आहे. अभिव्यक्त होऊ पाहणार्‍या तरुणाईसाठी फेसबुक खर्‍या अर्थाने उपयोगी आहे. त्यामुळे फेसबुकला आम्ही मुख्य अस्त्र म्हणून निवडले आहे, असे टीमचे सेकंड कमांडर नितीन सिंग म्हणाले. पक्षाने लोकसंपर्कासाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर केला आहे. मिस कॉलने त्यावर कोणासही सभासदत्व घेता येते. त्याकरवी मतदारांचा डेटा पक्षाकडे जमा झाला आहे. त्यामुळे मेल आणि मेसेजकरवी वॉर रूम मतदारांच्या संपर्कात राहू शकते. हजारो लोक ‘आप’ पेजच्या शोधार्थ असतात. त्यांना कनव्हेन्स करण्यासाठी स्वयंसेवकांना कष्ट घ्यावे लागत नाहीत. आकर्षक फॉरमॅट देऊन युर्जसना खेचण्याची आम्हाला कसरतही करावी लागत नाही, असे एक स्वयंसेवक म्हणाला.

स्वयंसेवकांची फौज
‘आप’च्या सोशल नेटवर्किंगची कमान स्वयंसेवकांच्या हाती आहे. यात अनिवासी भारतीयसुद्धा आहेत. सोशल नेटवर्किंगमध्ये आम्ही ‘स्वराज’ (विकेंद्रित) मॉडेल वापरत आहोत.’’ प्रीती शर्मा-मेनन, वॉर रूमप्रमुख.

सर्व प्रादेशिक भाषांमध्ये पक्षाची माहिती
‘आप’चा मीडिया सेलमध्ये गुजराती, मराठी, हिंदी, उर्दू भाषेतील कॉपी एडिटरही आहेत. प्रेस कॉपी शक्यतो इंग्रजीत बनते. त्यानंतर प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित करून माध्यमांना पाठवण्यात येते, अशी माहिती मीडिया सेलप्रमुख सनल नायर यांनी दिली. ‘आप’ची राष्ट्रीय आणि प्रादेशिक संकेतस्थळे सतत अपडेट होत असतात. प्रेस नोट, अपकमिंग इव्हेंट, नेत्यांचे दौरे आदींची माहिती संकेतस्थळावर दिली जाते. ट्विट वापरातही आप पुढे आहे. मेसेजने पत्रकारांना दैनंदिन माहिती कळवली जाते.