आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपच्या उमेदवारांना निवडणुकीपूर्वीच लागली धाप!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आम आदमी पार्टीचे ‘बाळ’ नुकतेच कुठे रांगायला लागले असताना पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी या बाळाला थेट लोकसभा निवडणुकांच्या मॅरेथॉन शर्यतीत उतरवण्याचा अट्टहास धरून आपल्याच पक्षाला अडचणीत आणले आहे.

निवडणुकीच्या युद्धाला नुकतीच कुठे सुरुवात होत असताना आपच्या अनेक उमेदवारांना धाप लागली आहे. यावरून त्यांची कुठलीच तयारी नसल्याचे उघड झाले. ना प्रचार साहित्य, ना गाड्या-घोडे, ना कार्यकर्ते, ना आर्थिक पाळबळ अशा परिस्थितीत निवडणुकांमधून माघार घेणे किंवा नावापुरते उभे राहण्यावाचून या उमेदवारांसमोर पर्याय राहिलेला नाही.

अंजली दमानिया, मयांक गांधी, मीरा संन्याल यांचा अपवाद वगळता आपचे बहुतांश उमेदवार हे चळवळीतील आहेत. त्यांचे आपापल्या क्षेत्रात चांगले वजन असले तरी निवडणुकांसाठी आर्थिक ताकद व मनुष्यबळाची प्रचंड कमतरता त्यांना जाणवते. स्वत:च्या खिशातून किंवा लोकवर्गणीतूनच खर्च करा, असे फर्मान केजरीवालांनी सोडले आहे. त्यामुळे पैशाचे सोंग आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाल्याने बहुतांश उमेदवारांनी लढाईआधीच कच खाल्ली आहे.

आपच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले की, अंजली, मीरा किंवा मयांक हे राज्यातील नेते. पण, त्यांनी आपल्या मतदारसंघाशिवाय इतरांकडे लक्षच दिलेले नाही. त्यामुळे आपचे तीन-चार उमेदवार सोडले तर बाकीच्यांची अवस्था ही पंधरा-वीस कार्यकर्त्यांच्या साथीने स्थानिक आंदोलन छेडणार्‍यांसारखी झाली आहे. सिंधदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील लोकांशी संपर्क ठेवणे व प्रचाराचा खर्च उचलणे शक्य नसल्याचे कर्नल गडकरींनी लढाई आधीच माघारीचा सफेद झेंडा फडकवला.

मेधा पाटकरांवरच पक्षाची आशा
मेधा पाटकर या एकमेव उमेदवार निवडून येण्याची ‘आप’ला अपेक्षा आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातील चेंबूर, मानखुर्द, गोवंडी या कष्टकरी, मजूर, कामगार भागांमध्ये मेधा यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे. तसेच मुलुंड, भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर या भागातील मध्यमवर्गात त्यांच्या कामाबद्दल आदर आहे. मुळात त्यांचे नाव घरोघरी माहीत असून मेधा यांना मानणारा राज्यभरातील कार्यकर्त्यांचा वर्ग आज त्यांच्याबरोबर निवडणुकांमध्ये मिळेल तसा वेळ व लोकवर्गणीतून मिळालेले पैसे निवडणुकीसाठी खर्च करताना दिसत आहे. केजरीवाल यांच्या मते आपच्या उमेदवारांनी लोकवर्गणीतून पैसा जमा करून निवडणुकांना सामोरे जायला हवे. पण, यासाठी त्यांनी किमान काही महिने उमेदवारांना तयारीसाठी द्यायला हवे होते, असे समाजवादी चळवळीमधून आपमध्ये गेलेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

रिडालोससारख्या गटांगळ्या
रामदास आठवले यांनी याआधीच्या निवडणुकीत डाव्या चळवळीतील सर्व पक्ष व संघटनांची एकत्र मोट बांधून रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी स्थापन करत तिसर्‍या आघाडीचा पर्याय उभा केला होता. पण, त्याचा पाया कच्चा असल्याने काही उमेदवारांनी निवडणुकीआधी हाय खाल्ली, तर उरलेल्यांनी निवडणुकांनंतर आघाडीतून काढता पाय घेतला. शेवटी आघाडीत रिपाइंच शिल्लक राहिल्याने पुन्हा या आघाडीचा निवडणुकीच्या मैदानात प्रयोग लावण्याची हिंमत आठवलेंना झाली नाही. अशीच अवस्था आम आदमी पक्षाची निकालानंतर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दिग्गजांशी लढत द्यावी कशी?
सुभाष वारे हे राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. पुण्यात त्यांच्याऐवजी चारित्र्याने चांगला, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार देण्याची गरज होती. काँग्रेसचा भ्रष्टाचार व भाजपचा दुतोंडीपणा यावर भर देऊन हा उमेदवार स्वत:च्या ताकदीवर लढत देण्यासाठी सक्षम असायला हवा होता. तरच प्रस्थापितांना आव्हान देणे शक्य होते. जी गोष्ट वारेंची, तीच संजीव सानेंची. समाजवादी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते साने यांच्याकडे निवडणुकीसाठी लागणारा आवाकाच कमी आहे. मग ते संजीव नाईक किंवा राजन विचारे यांना टक्कर देणार कसे, असे आपचेच पदाधिकारी खासगीत सांगतात.

दमानियांचा हायटेक प्रचार
अंजली दमानिया नागपूरमध्ये हायटेक प्रचार करत आहेत. मात्र त्यांच्या तुलनेत सुभाष वारे, संंजीव साने, कर्नल गडकरी, प्रतिभा शिंदे यांच्याकडे आर्थिक रसदच नव्हती. त्यामुळे कर्नल व शिंदे यांनी माघार घेतली आहे. नंदू माधव, दीपाली सय्यद या अभिनेत्यांना पक्षाने उमेदवारी दिली असली तरी बीड व नगरसारख्या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणार्‍या मतदारसंघात प्रस्थपितांना टक्कर देण्याकरिता किमान डिसेंबरपासून तयारी करायला हवी होती. पण, मागतो म्हणून दिली उमेदवारी असे करून आपने आपलेच हसे करून घेतले आहे, असे याच पक्षातील लोकांचे म्हणणे आहे.