आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap & Prakash Ambedkar May Joins In Hand In Vidharbha

आम आदमी आणि प्रकाश आंबेडकरांच्या पक्षात आघाडीचे संकेत, काँग्रेसशी चर्चा बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याबाबत अजून निर्णय न घेऊ शकलेल्या अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आम आदमी पक्षाशी युती करण्याची आमच्या आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघात अनेक छोटे-छोटे पक्ष व संघटनांचा समावेश आहे. यामुळे विदर्भात आघाडी-महायुती आणि आप-आंबेडकर आघाडी अशा तिरंगी लढती पाहयला मिळू शकतात. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत आम आदमी पक्षाच्या प्रदेश आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला पत्र लिहून आपली इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत महाराष्ट्राच्या आपच्या समन्वयक अंजली दमानिया यांनी सकारात्मक विचार करू असे म्हटले आहे. दिल्लीतील नेत्यांशी संवाद साधून आंबेडकर यांना सोमवारपर्यंत आम्ही निर्णय कळवू, असे दमानिया यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक होते. मात्र, पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी ही अट आंबेडकरांनी फेटाळून लावली. तसेच त्यानंतर काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे 5 मार्चला आपली भूमिका जाहीर करू असे सांगणा-या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची चर्चा बंद केल्याचे जाहीर केले. तसेच महाराष्ट्रात आम आदमी पक्ष व आमची आघाडी एकत्र निवडणुका लढविण्याचा विचार सुरु केला. त्यासाठी 'आप'ला पत्र लिहून आघाडी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. आम आदमी पक्षाकडून याबाबत उत्तर आले नसून एक-दोन दिवसात याबाबत निर्णय अपेक्षित आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाची विदर्भात चांगली ताकद आहे. अकोला मतदारसंघात काँग्रेसला आंबेडकरांना एकत्र घेतल्याशिवाय विजय मिळवणे अशक्य असल्याचे मागील निवडणुकांत स्पष्ट झाले आहे.
येत्या आठवड्यात आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे काँग्रेससह इतर राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. भाजप नेत्यांनीदेखील त्यांच्या भूमिकेविषयी चाचपणी केल्याचे सांगण्यात आले. भारिप-बमसं व काँग्रेस यांच्यातील आघाडीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. तसेच याला 5 मार्च पूर्वी पूर्णविराम देऊ, असे अँड. आंबेडकर यांनी सांगितले होते. मात्र, आता काँग्रेसशी चर्चा बंद केल्याने व आम आदमीला पत्र लिहल्याने काँग्रेससह भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. अँड. आंबेडकर हे दिल्लीतून नुकतेच परतले असल्याने तेथे आपच्या नेत्यांशी संपर्क साधला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले तरी काँग्रेस शेवटच्या क्षणी आंबेडकरांना पाठिंबा जाहीर करेल, असे सांगितले जात आहे.