मुंबई- आम आदमी पक्षातील (
आप) बंडखोर नेत्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षातील बंडखोर नेते योगेंद्र यादव यांनी शुक्रवारी रात्री मुंबईत आपल्या 70 समर्थकांसोबत बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तास चाललेल्या या बैठकीत नवा पक्ष स्थापन करण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीस उपस्थित असलेले आपचे नेते मारुती भापकर यांनी सांगितले की, ‘बैठकीत यादव यांनी नवा पक्ष स्थापन करण्याबाबत चर्चा केली. त्यांनी
केजरीवाल हे हुकुमशाह असल्याचा आरोप केला. भापकर पुढे म्हणाले की, यादव देशभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत व त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहेत.
केजरीवाल यांच्या हेकेखोरपणामुळे आपमधील अनेक नेते दुखावले आहेत. त्यांनी यादवांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केला आहे. योगेंद्रजी लवकरच सर्व कार्यकर्त्यांची भेट घेऊन येत्या 14 एप्रिलला अंतिम निर्णय घेतील.
प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य मानव कांबळे यांनी म्हटले आहेकी, बहुतेक कार्यकर्त्यांचे हे म्हणणे आहे की, नव्या पक्षाची स्थापना येत्या 14 एप्रिलला करू नये. त्यासाठी काही वेळ घेतला पाहिजे. तर काही सदस्यांचे म्हणणे आहे की, पक्ष स्थापन करण्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांचे समर्थन मिळवले पाहिजे.
बडे नेते बैठकीपासून दूरच-
मुंबईत झालेल्या बैठकीत ज्यांनी भाग घेतला होता ते सर्व यादव आणि प्रशांत भूषण यांचे समर्थक मानले जातात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे परिसरातील समर्थकांनी या बैठकीत भाग घेतला. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य लिंगराज प्रधान यांनीही सहभाग घेतला. मात्र या बैठकीपासून अंजली दमानिया, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयंक गांधी, आपचे राज्य समन्वयक सुभाष वारे, मीरा संन्याल यांनी भाग घेतला नाही.
योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत सध्याच्या स्थितीवर व भविष्यात कोणत्या दिशेने काम करावे यावर चर्चा झाली. हा एक संवाद होता की आपण आता कुठे उभा आहोत आणि आता आपल्याला कोठे जायला हवे हे समजून घेण्यासाठी. यात नवी पक्ष बनविणे किंवा जुना पक्ष तोडणे यासारख्या बाबींशी देणे-घेणे नाही.
14 एप्रिलला होणार नव्या पक्षाची घोषणा?-
केजरीवाल यांच्या अरेरावीमुळे दुखावलेले ‘आप’मधील कार्यकर्ते यादवांच्या संपर्कात आहेत. यादवांना त्यांचे समर्थन मिळत आहे. येत्या 14 एप्रिलला केजरीवाल यांच्यावर नाराज असलेल्या आपमधील नेत्यांची गुरगाव येथे बैठक होत आहे. या बैठकीला स्वराज संवाद असे नाव देण्यात आले आहे. याबाबत सांगितले जात आहे की, या बैठकीत नवीन पक्ष स्थापन करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. तसे झाल्यास स्वराज नाव असलेल्या पक्षाची स्थापना केली जाऊ शकते.