आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत उतरणार ‘आरे’! शेतकऱ्यांच्या दुधाला शहरात विक्रीची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून थेट दूध न घेता सहकारी सोसायट्यांमार्फत राज्य सरकार दूध घेते. दुधाचे प्रमाण कमी असल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील नागरिकांना दूध पुरवणे आरेला कठीण जात आहे. त्यामुळे राज्याचा दुग्ध व्यवसाय विभागही खडतर स्थितीत आहे. आरेची डेअरी असलेल्या जागा विकण्यावरही डोळा ठेवण्यात आलेला आहे. हे टाळण्यासाठी आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून थेट दूध विकत घेऊन ते शहरवासीयांना पुरवण्याबरोबरच खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत आरे उतरणार असून राज्यात आरेचे दूध उपलब्ध करून देण्याबाबत दुग्धविकास विभाग विचार करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारी सोसायट्यांकडून दूध घेण्याच्या निर्णयामुळे सरकारला आवश्यक तेवढ्या दुधाचा पुरवठा होत नाही. त्यामुळे सर्वांना दूध उपलब्ध करून देणे आरेला शक्य होत नाही. त्यामुळे शहरी भागातील दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी खासगी कंपन्या पुढे आल्या आहेत. मदर डेअरी, अमूल अशा काही मोठ्या कंपन्या यात उतरल्या असून त्या शेतकऱ्यांकडून थेट दूध विकत घेतात आणि दुधाचा पुरवठा करतात. शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध घेऊन या कंपन्या नफा कमवतात. मात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही.
जेव्हा दूध जास्त होते तेव्हा दूध उत्पादक सरकारकडे येतात. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकार दूध विकत घेऊन भुकटी बनवून त्याची विक्री करते. यात सरकारचेच नुकसान होते. दुधाचे दर वाढवावेत म्हणूनही दूध उत्पादक सरकारकडेच धाव घेतात. या बाबी लक्षात घेऊन कृषी व पणन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला जशी थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांकडील दुधाला मुंबईसारख्या ठिकाणी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे.

आरेला लोकप्रिय करू
ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचे दूध विकत घेऊन आरे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय करण्याचा विचार सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांना राज्यभर एकच दर न देता मुंबई व ग्रामीण असे दोन वेगळे दर देता येतील का, यावरही विचार सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव दुग्धविकास विभागाने सरकारला सादर केला आहे.
बिजय कुमार, प्रधान सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास

काय आहे प्रस्ताव?
खासगी कंपन्यांप्रमाणे शेतकरी गट किंवा एखाद्या शेतकऱ्याकडील दूध थेट खरेदी करण्याची परवानगी डेअरीला देण्यात यावी. नाशिक, नगर, सातारा, सांगली अादी ठिकाणचे दूध मुंबईत आणून सरकारी डेअऱ्यांत विकण्यास परवानगी देण्यात यावी. सरकारी डेअऱ्यांना अन्य राज्यांत दुधाचा व्यवसाय करण्यास संधी उपलब्ध करून देण्यात यावी, आदी सूचना प्रस्तावात मांडण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...