मुंबई- नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानची 15 वर्षाची मलाला युसूफजई जर भारतात आली तर तिच्या स्वागताला शिवसेना उभी राहील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हरियाणातील बल्लभगढमध्ये जे घडले आहे तो सामाजिक न्यायाचा प्रकार नक्कीच नाही. याबाबत आम्ही भाजपमधील बड्या व केंद्रीय नेत्यांच्या प्रतिक्रियाची वाट पाहत आहोत असे सांगत अर्थमंत्री अरूण जेटलींना टोला हाणला आहे.
'चर्चेती पातळी वाढवा, गुंडागर्दी व विध्वंत्साची नको' अशा शब्दांत अर्थमंत्री अरूण जेटलींनी सेनेला फटकारले होते. त्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. भाजप सत्तेत असलेल्या हरियाणात बल्लभगढ येथील सेनपेट गावात सुवर्ण जातीच्या लोकांनी दलित कुटुंबावर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. यात दोन चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. तर आई-वडिल गंभीर भाजले आहेत. यावरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे.
भाजपचे माजी नेते सुधींद्र कुलकर्णी यांनी मंगळवारी एका वाहिनीवर बोलताना, पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते व दहशतवादाविरोधात लढा देणारे कादरीचाचा आणि मलाला युसूफजई यांना भारतात बोलवू असे सांगत शिवसेनेला आव्हान दिले होते. मात्र, शिवसेनेने मलालाचे भारतात स्वागत करू व शिवसेना तिच्या स्वागताला उभी राहील असे प्रत्त्युत्तर दिले आहे. मलाला पाकिस्तानात सुरू असलेल्या दहशताविरोधात लढली आहे. मलालाने पाकिस्तानमधील दहशवादाविरोधात लढा देत स्वत:च्या शरीरावर गोळया झेलल्या आणि आजही तिचा संघर्ष सुरुच आहे. त्यामुळे दहशतवादाला विरोध करणा-या मलालाचे स्वागत शिवसेना करेल. मलालाचे भारतात झालेले स्वागत पाक-प्रेमी लोकांना धडा असेल, असेही संजय राऊतांनी सांगितले.
भाजपला लक्ष्य करताना संजय राऊतांनी हरियाणातील घटनेवरून टीका केली. गुंडगिरी वा तोडफोड करण्याऐवजी आम्ही आपल्या चर्चेचा स्तर उंचावला पाहिजे, अशी टीका जेटलींनी शिवसेनेवर केली होती. याबाबत संजय राऊत म्हणाले, भाजपच्या बड्या नेत्यांनी जे सांगितले आहे त्याचा आम्ही नक्कीच विचार करू. पण हरियाणात जे काही हिंसक व दलितांना जाळण्यापर्यंत घटना घडली आहे. हे नक्कीच सामाजिक न्यायाचा प्रकार नाही. त्यामुळे यावर दिल्लीतील भाजप नेते काय बोलतात याकडे आमचे लक्ष आहे असे सांगत राऊतांनी भाजपवर लक्ष्य केले.