आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aba Disappointed In Meeting Of Minister Of Council

गृहमंत्र्यांचा अंगार, मुख्यमंत्री थंडगार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुष्काळग्रस्त विभागाला समान निधी मिळत नसल्याचा आरोप करत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संताप व्यक्त केला. तसेच दुष्काळनिधी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आमदार-खासदारांनी आपले पगार द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दुष्काळाच्या प्रश्नावर आबा संतापलेले असताना मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शांतपणे दुष्काळी भागात कामे योग्य पद्धतीने होत असल्याचे प्रशस्तिपत्रक दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. आर. आर. पाटील म्हणाले की, राज्यातील स्थिती अत्यंत गंभीर होऊ लागली आहे. पाऊस अजून दूर असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र हा निधी ठरावीक विभागालाच मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सूत्रांनी सांगितले की, दुष्काळावरील चर्चेच्या वेळी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पतंगराव कदम यांच्याकडे असलेल्या मदत व पुनर्वसन खात्यातर्फे फक्त ठरावीक विभागालाच निधी दिला जात असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. सर्व विभागांना निधी दिला जात नाही, दुजाभाव केला जात आहे. निधी कमी पडत असल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपला दोन महिन्यांचा पगार द्यावा तसेच सर्व आमदार आणि खासदार यांच्याकडूनही एक महिन्याचा पगार दुष्काळनिधीसाठी द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. राज्यातील देवस्थाने आणि अन्य सामाजिक संस्थांकडून दुष्काळनिधीसाठी मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी करावे. या सगळ्यांनी मदत केल्यास राज्यात एक हजार कोटींच्या आसपास दुष्काळनिधी उभा राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात 1,356 गावात टंचाई,
1,730 टँकरद्वारे पाणी पुरवठा

राज्यातील 1 हजार 356 गावातील 3 हजार 938 वाड्यात पाणीटंचाई जाणवत असून त्या ठिकाणी 1,730 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. अद्यापही टंचाई जाणवत असेल, त्या ठिकाणी आणखी टँकर्स तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने रोहयोची 21 हजार 496 कामे सुरु असून त्यावर 2 लाख 912 मजूर काम करीत आहेत.

भेदभाव होत नाही : मुख्यमंत्री
गृहमंत्र्यांनी अत्यंत आक्रमकतेने दुष्काळग्रस्तांची व्यथा मांडली खरी; परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र अत्यंत थंडपणे त्याची दखल घेतल्याचे सांगितले जाते. दुष्काळ निधीवाटपात कसलाही भेदभाव केला जात नाही. राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना योग्य ती आणि पुरेशी मदत करीत असल्याने मंत्र्यांनी पगार देण्याची गरज नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आबांचा प्रस्ताव फेटाळला.