आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवारचे परिणाम तीन वर्षांत, फडणवीस यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील ८० टक्के शेती कोरडवाहू असल्याने पाण्याची शाश्वत यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही जलयुक्त शिवार योजना अाखली असून त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे लोकसहभागातून या योजनेद्वारे २५० कोटी रूपये किंमतीची कामे पार पडली असून शेतीचा विकास करण्यासाठी येत्या पाच वर्षांत अतिरिक्तचे २५ हजार कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनीही या योजनेचे कौतुक केल्याने राजस्थान सरकारने या योजनेची माहिती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील निवडक पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री गप्पा मारल्या. गेली काही वर्षे सतत अवर्षणाने विदर्भ आणि मराठवाडयातील पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे.काँग्रेस आघाडी सरकारचा नियोजनशून्य कारभारही याला तितकाच कारणीभूत आहे.मात्र अडचणीत आलेल्या शेतक-याला कोणत्याही परिस्थितीत मदत करायचीच हे धोरण आम्ही स्वीकारले आहे. पावसाअभावी विदर्भ, मराठवाडयातील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात विदर्भ आणि मराठवाडयातील पाण्याची समस्या पूर्णपणे सोडवणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधक आणि शिवसेनाही कर्जमाफीवर अडून बसली असल्याबाबत विचारता मुख्यमंत्री म्हणाले, मोठया प्रमाणात शेतकरी असे आहेत की ज्यांनी बँकांकडून कर्जे घेतलेलीच नाहीत. कर्जमाफी दिली असती तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर बँकानांच झाला असता. शेतकऱ्यांना थेट मदत व्हावी यासाठीच हेक्टरी दीड हजार रुपये देण्यात येणार असून दुबार पेरणी करावी लागल्यास बियाणे मोफत देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या मुखपत्रातून होत असलेल्या टीकेबाबत विचारता, गेले काही दिवस मला वर्तमानपत्रे वाचण्यास वेळच मिळालेला नाही, त्यामुळे त्यात काय लिहिले आहे ते ठाऊक नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

त्यांची प्रकरणे तर सगळ्यांसमोरच
तुमच्या मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणून तुम्ही विरोधकांची प्रकरणे बाहेर काढत आहात का असे विचारता मुख्यमंत्री म्हणाले, आम्हाला प्रकरणे बाहेर काढण्याची आवश्यकताच नाही. ती प्रकरणे सगळ्यांसमोरच आहेत. ते करतात म्हणून आम्हाला तसेच करण्याची गरज नाही. जे काही आहे ते समोर येईलच असेही मुख्यमंत्री म्हणाले.