आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा लाखांवरील निविदांचे आता ई- टेंडरिंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - राज्यातील शासकीय निविदा प्रक्रियेत होणारे घोटाळे आणि यात किमान पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहा लाख अथवा त्यावरील रकमेच्या कामाच्या निविदा ई निविदा प्रक्रियेनेच काढण्याचा महत्त्वाचा निर्णय गुरुवारी घेतला.

आतापर्यंत 50 लाख रुपये व त्यापेक्षा जास्त रकमेच्या कामांच्या निविदा ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शासनाचे विविध विभाग, महामंडळे आदींकडून अनेक प्रकारची कामे करून घेतली जातात. विविध उपकरणांची खरेदीही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तसेच विविध सेवा उपलब्ध करून घेतल्या जातात. या निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी 50 लाख किंवा त्यापेक्षा अधिक खर्चाच्या कामांच्या निविदा ई-टेंडरिंग पद्धतीनेच करण्याची अट शासनाने घातली होती.

या प्रक्रियेसाठी शासनाने नेमलेल्या सिफी नेक्स टेंडर्स या सिस्टिम इंटिग्रेटरमार्फत सरकारचे विविध विभाग, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा प्रकारच्या 51 शासकीय आस्थापनांसाठी ई-निविदेच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून आतापर्यंत 3 हजार 708 ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या व त्यापैकी 2 हजार 247 प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. ई-निविदेमुळे शासकीय कामे, खरेदी व विविध सेवा उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेत आलेली पारदर्शकता पहाता ई-निविदा कार्यप्रणाली 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मूल्यांच्या निविदांसाठी वापरण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ही कार्यप्रणाली 1 फेब्रुवारी 2013 पासून अंमलात येणार आहे.