आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एबीपी माझा’तर्फे दहा मान्यवरांचा गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणा-या दहा मान्यवरांचा नुकताच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीतर्फे ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘सर्वस्पर्शी विषयांवरील उत्तम कामगिरी करणा-यांना सन्मानित करून या वाहिनीने त्यांच्या कामाची योग्य ती दखल घेतली,’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत मोलाची कामगिरी करणा-यांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. ‘सरहद्द’ या संस्थेद्वारे सीमेवरील मुलांच्या शिक्षणासाठी झटणारे संजय नहार, विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी नेमबाज राही सरनोबत, दलित उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘डिक्की’ या संस्थेद्वारे मदत करणारे उद्योजक मिलिंद कांबळे, पाणी संवर्धनाचा सल्ला प्रत्यक्ष कृतीतून देणारे अंबरीश पटेल व सुरेश खानापूरकर, तरुण संगीतकार स्नेहा खानवलकर, मलेरिया या आजारावर परिणामकारक लस शोधण्यासाठी संशोधन करणारे डॉ. चेतन चिटणीस, ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, लेखक किरण नगरकर,ज्येष्ठ नाटककार विजयाबाई मेहता व ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांना याप्रसंगी मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले. दलित हे केवळ मागणारे नव्हेत, तर देणारेही आहेत, असे सांगत आपले पाच हजार कर्मचारी नियमित आयकर भरत असल्याचे मिलिंद कांबळे
यांनी सांगितले.


याप्रसंगी प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सन्मानित सर्वांच्या कार्याचे कौतुक करीत एबीपी माझा या वाहिनीचेही कौतुक केले. या कार्यक्रमाला दिग्दर्शक जब्बार पटेल, वीणा पाटील, किरण शांताराम, सोनाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.