आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abu Jundal No Charge Sheet Without Appears In Court

अबू जुंदालला न्यायालयात प्रत्यक्ष हजर केल्याशिवाय आरोप निश्चिती नको

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -‘जोपर्यंत न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्यात येत नाही, तोपर्यंत आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्यात येऊ नयेत’, अशी विनंती 26/11 हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदालने मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाला केली.

जबीने मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा तपासयंत्रणांचा दावा आहे. मुंबई हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांना त्यानेच हिंदीचे धडे दिले व प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी तो कराचीतील नियंत्रण कक्षात बसून या दहशतवाद्यांना सूचना दिल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तसेच, 2006च्या औरंगाबाद शस्त्रास्त्र साठा प्रकरणातही तो आरोपी आहे. त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. औरंगाबाद शस्त्रास्त्र प्रकरणी त्याच्या विरोधात मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला न्यायाधीश एम. एस. मोडक यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होईल.

सौदी अरेबियातील आपल्या वास्तव्यात आपल्यावर मानसिक उपचार सुरू होते. त्यामुळे आपले मन:स्वास्थ्य बिघडू नये, यासाठी आर्थर रोड तुरुंगात ज्या ठिकाणी कसाबला ठेवण्यात आले होते, त्या ठिकाणी आपल्याला ठेऊ नये, अशीही विनंती त्याने न्यायालयाला केली होती. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, शस्त्रास्त्रे आणि स्फोटके बाळगण्याविरोधातील कायदा, भारतीय दंडसंहिता व मोक्का कायद्यान्वये विविध कलमांखाली त्याच्याविरोधात आरोप ठेवण्यात आले आहेत.