आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्तुगालला परतण्यासाठीच अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमवर घडवला हल्ला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमवर गुरुवारी रात्री तळोजा तुरुंगात झालेला हल्ला तसेच यापूर्वी त्याच्यावर तुरुंगातच झालेल्या हल्ल्यामुळे पोर्तुगाल सरकारकडून सालेमला परत मागितले जाण्याची शक्यता आहे. पोर्तुगालमध्ये पोहोचल्यावर लवकर सुटका होण्याचीही आशा असल्याने सालेमने स्वत:च हल्ला घडवून आणला असावा, असा संशय पोलिस व गुप्तचर यंत्रणांना आहे.

गुरुवारच्या हल्ल्यात सालेमच्या उजव्या हाताचा अंगठा व अनामिका यात गोळी लागली. त्याला रात्री दहाच्या सुमारास एमएनएमसी रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचार करून नंतर जे. जे. रुग्णालयात हलवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

चार गोळय़ा झाडल्या

हल्ला करण्यासाठी जे पिस्तूल वापरली गेले ते भारतीय बनावटीचे मशीनमेक पिस्तूल असून त्यातून 7.6 एमएमची गोळी त्याला मारली गेली. पिस्तुलात चार गोळ्या होत्या. पैकी तीन गोळ्या जगतापने चालवल्या. पहिली गोळी सालेमच्या उजव्या हाताचा अंगठा व अनामिकेच्या मध्ये घुसली. दुसरी गोळी सालेमने चुकवली. तिसरी गोळी मिसफायर झाली व चौथी पिस्तुलाच्या मॅगझिनमध्येच होती, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.

पिस्तूल आले कुठून?

न्यायालयात गुरुवारी देवेंद्र जगतापचा खटला होता. या खटल्यावरून जगताप याला पुन्हा रात्री 7.45 वाजता तुरुंगात आणण्यात आले. सालेमला अंडा सेलमध्ये ब्लॉक चारच्या खोली क्रमांक 46 मध्ये ठेवण्यात आले होते. तर जगताप ब्लॉक एकमध्ये होता. न्यायालयातून आल्यावर पाय मोकळे करण्यासाठी सर्व ब्लॉकना जोडणार्‍या पॅसेजमध्ये जगताप गेला होता. चालत चालत तो ब्लॉक क्रमांक चारच्या समोर गेला. सालेम आपल्या खोलीतून बाहेर येऊन ब्लॉकमध्ये उभा असताना त्याने गोळय़ा झाडल्या. या हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल त्याला तुरुंगातच पुरवण्यात आली की न्यायालयात गेला असताना त्याला ती दिली गेली, हा तपासाचा विषय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हल्लेखोर कोण? दाऊद की मुस्तफा?

पोलिस चौकशीत सालेम गोंधळात टाकणारी उत्तरे देत होता. दाऊदने भारत नेपाळीकरवी हा हल्ला केल्याचे त्याने सांगितले. मात्र नेपाळी तर जिवंत नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर शकील आणि छोटा राजनचे नाव घेतले. पुन्हा मुस्तफा डोसाचे नाव घेतले. त्यामुळे या हल्ला सालेमने घडवून आणला की दुसर्‍या टोळीने, अशा दोन्ही बाजूंनी पोलिस तपास केला जात आहे.

साब, टी शर्ट ठीक नहीं और टीवी वाले बाहर खडे हैं
जे. जे. रुग्णालयात हलवण्यापूर्वी सालेमने पोलिस अधिकार्‍यांना विनंती केली की, ‘साब, बाहर सब मीडिया वाले और पब्लिक खडी है. मेरा टी शर्ट फट गया है और गंदा हुआ है, जो भी करना है वो इधरीच करो.’ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असलेल्या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना हा प्रसंग सांगितला. तसेच अशा प्रसंगातही माध्यमांबाबतचे भान बाळगणारा हा माफिया डॉन आपल्याकडील राजकीय नेत्यांपेक्षाही हुशार असल्याची प्रतिक्रियाही या अधिकार्‍याने दिली.

चार पोलिस निलंबित
तळोजाचे तुरुंगाधिकारी संजय साबळे, कॉन्स्टेबल चंद्रकांत पाठारे, नितीन सावंत आणि गीतेश रणदिवे यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.