मुंबई - अबू सालेम हा एक साधारण गुंड आहे. तो काही खूप शक्ती असलेला मानव नाही जो अनेक पोलिसांच्या गराड्यातून सहज पळून जाईल, असे स्पष्ट मत विशेष टाडा न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी हे मत व्यक्त करतानाच सालेमला न्यायालयात आणताना बेड्या घालून आणण्याची कोणतीही गरज नाही, असेही पोलिसांना बजावले.
मुंबई बॉम्बस्फोटासह इतर अन्य गुन्ह्यांखाली अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याला तुरुंगातून न्यायालयात आणताना बेड्या घालून आणण्यात येते. त्याविरुद्ध त्याने टाडा न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी या कारवाईचे समर्थन करताना सत्र न्यायालयातून नुकताच पळून गेलेल्या अतिरेकी अफझल उस्मानी घटनेचे न्यायमूर्तींना उदाहरण दिले. परंतु अफझल उस्मानी हा त्याच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे तसेच निष्काळजीपणामुळे पळाला आणि तो पळाला म्हणून तुम्ही आता सालेमला बेड्या घालून आणता हे कदापिही समर्थनीय नाही, असे मत व्यक्त करत न्यायमूर्ती सानप यांनी बेड्या घालण्यास पोलिसांना मज्जाव करावा, अशी विनंती करणारा सालेमचा अर्ज मान्य केला.
देवेंद्र जगताप ऊर्फ जेडे या गँगस्टर्सने सालेमवर झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी त्याच्या हाताला लागली होती. तेव्हापासूनच त्याला बेड्यांचा त्रास होतोय. त्यामुळे त्याची बेड्या घालून घेण्यास हरकत आहे. परंतु पोलिसांना त्याचा मुद्दा मान्य नाही. त्यामुळेच हे प्रकरण कोर्टात आले होते.