आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशीची शिक्षा सुनावताच सांत्वन करणाऱ्या सालेमला फिरोज खानकडून धक्काबुक्की, शिवीगाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- निकाल सुनावल्यानंतर दोषींना आपल्या वकिलांशी बोलण्याची संधी मिळावी, यासाठी काही काळ न्यायालयातच ठेवले होते. आरोपीच्या पिंजऱ्यातून अबू सालेम बराच वेळ आपल्या वकिलाशी चर्चा करत होता. ताहीर टकल्याही अगदी हलक्या आवाजात  वकिलांशी बोलत होता, तर फिरोज खानला पिंजऱ्याबाहेर येऊन आपल्या वकिलाशी चर्चा करायची होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पिंजऱ्याबाहेर पडण्यास पोलिसांनी नकार दिल्याने फिरोज खान अस्वस्थ झाला होता. फिरोज खानची अस्वस्थता पाहून मागच्या बाकड्यावरच्या अबू सालेमने फिरोजचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला हलकासा धक्का देत फिरोजने सालेमला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

फाशीची शिक्षा ऐकताच भांबावला ताहीर टकल्या, फिरोेजही हताश
दहशतवादी कृत्य करणे, बॉम्बस्फोटाचा कट रचणे आणि बळी पडलेल्यांच्या मृत्यूस कारणीभूत होण्याच्या आरोपाखाली दोषी ठरल्याने ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे. बरोबर एकच्या सुमारास विशेष टाडा न्यायालयाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी आपला फैसला सुनावला..आणि ताहीर टकल्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. काहीशी अशीच स्थिती फाशीची शिक्षा झाल्यानंतर आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या फिरोज अब्दुल रशीद खान ऊर्फ फिरोज खानची झाली होती. 
  
गुरुवारी सकाळी साधारण साडेदहा पासून मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात असलेल्या विशेष टाडा न्यायालयात वकील, पत्रकार, पोलिस आणि सीबीआयचे अधिकारी यांची गर्दी जमू लागली होती. तब्बल २४ वर्षे ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दुसऱ्या खटल्याचा निकाल सुनावण्यात येणार होता. एकेका आरोपीला न्यायालयात आणले जात होते. सर्वात आधी अबू सालेमला न्यायालयात अाणले गेले. आकाशी रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची विजार परिधान केलेल्या सालेमने न्यायालयात येताच आपल्या वकिलांशी चर्चा सुरू केली. काही वेळाने फिरोज खानला न्यायालयात आणले गेले. त्यापाठोपाठ मग रियाझ सिद्दिकी, करिमुल्ला खान आणि सर्वांत शेवटी ताहीर टकल्याला न्यायालयात आणले. न्यायालयात आल्यावर त्या सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. साधारण दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर अखेर न्या. सानप न्यायासनावर स्थानापन्न झाले. आल्या आल्या त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. मात्र, आवाज सर्वांपर्यंत पोहोचत नाही, हे लक्षात येताच त्यांनी न्यायालयातील सर्व पंखे बंद करण्यास सांगितले. 

शिक्षा एेकताच हताश
सुरुवातीला करिमुल्ला खान, त्यानंतर अबू सालेम, रियाझ सिद्दिकी अशी एकेकाची नावे पुकारत त्यांनी शिक्षा सुनावल्या. सर्वात शेवटी ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या आणि फिरोज खान यांच्या फाशीच्या शिक्षेची घोषणाही त्यांनी केली. फाशीची शिक्षा ऐकताच असहाय आणि भांबावलेल्या डोळ्यांनी ताहीर टकल्या आपल्या वकिलाकडे पाहू लागला, तर फिरोज खान शिक्षा ऐकताच हताशपणे डोक्याला हात लावून बाकड्यावर बसून होता. संपूर्ण निकालाचे वाचन झाल्यावर न्यायमूर्ती सानप आपल्या दालनात निघून गेले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... साखळी बॉम्बस्फोटांनी कशी हादरली होती मुंबई... रस्त्यावर पडला होता मृतदेहांचा सडा...
बातम्या आणखी आहेत...