आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करण्यासाठी अबू सालेमला हवीय पॅराेल; न्यायालयाने मागितले सीबीअायकडून उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई १९९३ साखळी बाॅम्बस्फोटांतील दोषी आणि अंडरवर्ल्ड डाॅन अबू सालेमला वयाच्या ४७ व्या वर्षी लग्न करायचे आहे. त्यासाठी अबू सालेमने विशेष टाडा न्यायालयात पॅरोल रजेसाठी विनंती अर्ज केला आहे. २०१४ मध्ये सालेमने धावत्या ट्रेनमध्ये एका मुलीशी लग्न केल्याची जोरदार चर्चा होती. या अर्जामुळे आता पुन्हा एकदा सालेमच्या लग्नाची चर्चा सुरू झाली असून न्यायालयाने सीबीआयला सालेमच्या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.   

१९९३ साखळी बॉम्बस्फोटांच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपाखाली टाडा न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वी अबू सालेमला दोषी ठरवले आहे. तसेच पोर्तुगालसोबतच्या प्रत्यार्पण करारातील अटींमुळे शिक्षेबाबतच्या युक्तिवादादरम्यान सीबीआयने सालेमसाठी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली आहे. दरम्यान, अबू सालेमच्या वकील फरहाना शाह यांनी सोमवारी न्या. जी. ए. सानप यांच्यासमोर सालेमच्या लग्नासाठी पॅरोल रजेचा विनंती अर्ज सादर केला आहे. आपल्या अर्जातील दाव्याला बळकटी देण्यासाठी सालेमच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन निकालांचे संदर्भ दिले आहेत. या दोन्ही निकालांमध्ये न्यायालयाने तुरुंगवासादरम्यान लग्नासाठी रजा दिली असल्याने त्याच धर्तीवर सालेमलाही रजा मिळावी, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.    

गेल्या वर्षी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न झाल्याच्या बातम्या  झळकल्या होत्या. सालेमला एका खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईहून लखनऊला घेऊन जात असताना, सालेमने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या एका मुलीशी धावत्या ट्रेनमध्येच लग्न केल्याचा दावा या बातम्यांमध्ये करण्यात आला होता. सुरुवातीला या बातमीचा सालेमने इन्कार केला होता. मात्र फोटो आल्यानंतर स्वत: अबू सालेमनेही त्या मुलीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे न्यायालयात कबूल केले होते. दुसरीकडे मात्र अबू सालेमशी ट्रेनमध्ये लग्न झाल्याच्या खोट्या बातम्यांमुळे आपले जगणे मुश्किल झालेय, त्यामुळे आता मला अबू सालमेशी लग्न करावेच लागेल, असे कौसरने टाडा न्यायालयात सांगितले होते. त्याचाच आधार घेत आता केलेल्या अर्जादरम्यान अबू सालेमने संबंधित मुलीच्या विनंतीचा विचार करून आपल्याला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रीतसर लग्न करण्याची परवानगी मिळावी, असे नमूद केले आहे.  

सालेमवर २४ गुन्हे  
११ नोव्हेंबर २००५ रोजी पोर्तुगालच्या लिस्बन येथून अबू सालेमचे गुन्हेगार हस्तांतरण करारानुसार भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत अबू सालेमवर गंभीर स्वरूपाचे खटले सुरू आहेत, त्यामुळे त्याला बऱ्याचदा दुसऱ्या राज्यांतील न्यायालयात हजर करण्यासाठी रेल्वेने त्याची ने-आण केली जाते.अबू सालेमविरोधात एकूण २४ गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी ८ गंभीर गुन्हे आहेत.
बातम्या आणखी आहेत...