मुंबई- राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या मुंबईतील कफपरेड परिसरातील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)ने दोन दिवसापूर्वी छापा टाकल्याचे पुढे येत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील परंदवडी गावातील भैरवनाथ देवस्थानच्या जमीन विक्री प्रकरणात धस यांनी
आपल्या अधिका-यांच्या मार्फत लाच घेतल्याचा संशय एसीबीला आहे. त्यामुळेच धस यांच्या मालकीच्या बंगल्यावर या जमीन विक्री प्रकरणातील कागदोपत्रे ताब्यात घेण्यासाठी एसीबीने ही कारवाई केली आहे.
परंदवडी गावातील भैरवनाथ देवस्थानच्या 44 एकर जमिनीपैकी 18 एकर जमिनीची तत्कालीन महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे सुनावणी झाली होती. देवस्थानाच्या पूजा-याच्या मार्फत 18 एकर जमिन विक्रीस काढली होती. त्यास गावक-यांनी विरोध केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल पूजा-यांच्या बाजूने देण्यासाठी एका व्यावसायिकाने धस यांच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यानुसार निकाल देण्यात आला. मात्र त्याबदल्यात धस यांचे अधिकारी असलेल्या तीन व्यक्तींनी 25 लाख रूपये मागितले होते. त्यातील 23 लाखांची लाच घेताना या अधिका-यांना एसीबीने रंगेहाथ पकडले होते.
या प्रकरणात सुरेश धस यांच्यावरही संशय असल्याने एसीबीने कायदेशीररित्या कोर्टाकडून सर्च वॉरंट मिळवून धस यांच्या बंगल्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये धस यांच्या घरातून देवस्थान जमिनीच्या आदेशाच्या मूळ प्रती आणि सहकार खात्याशी संबंधित काही महत्त्वाच्या फाईल्स जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.