आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्याने घेतला आईचा जीव, दुचाकीचालक मुलीवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये खड्ड्यांमुळे खाली पडून एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी खराब रस्ते बांधल्याबद्दल कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्याऐवजी मृतकाच्या मुलीवरच गुन्हा दाखल करण्याचा अजब प्रकार पोलिसांनी केला आहे.

वर्षभरापूर्वीच बांधलेल्या अंबरनाथ पूर्वेतील कल्याण-कर्जत रोडवर २६ जुलै २०१५ रोजी प्रीती प्रसाद आणि तिची ४९ वर्षीय आई रिता दुचाकीने जात होत्या. रस्त्यात असलेल्या मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्याने रिता खाली यांना गंभीर दुखापत झाली. पाच दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर आल्यानंतर प्रीती या रस्त्याच्या कंत्राटदाराविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या. मात्र, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास वळवी यांनी तक्रार दाखल करण्याऐवजी प्रीतीवरच निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला.

राजकीय गुंडगिरीसाठी कुख्यात : अंबरनाथ नगर परिषदेत सुमारे १५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. प्रतिस्पर्धी नगरसेवकांचे खून, भ्रष्टाचारांविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना मारहाण वा त्यांचे खून करणे यासाठी येथील सर्व पक्षाचे राजकारणी ओळखले जातात. येथील शिवसेनेच्या एका नेत्याने गेल्या महिन्यात हक्काची कागदपत्रे मागणाऱ्या सामान्यंाना गुंडांच्या मदतीने बेदम मारहाण केली. याविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या या लोकांना पोलिसांनी तक्रार नोंदण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हे नोंदविण्याची धमकी दिली. सुमारे दोन दशके सत्तेत असलेल्या शिवसेनेला या भागातील भ्रष्टावर व गुंडगिरीवर अंकुल मिळालेले नाही. यापूर्वीही येथे खड्ड्यांमुळे काही जणांचा मृत्यू झाला असून अनेकांचा अपघात झाला आहे. रीता यांच्या मृत्यूस कारणीभूत रस्त्याचे बांधकाम राज्य सरकारच्या अखत्यारीतील मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी नगर परिषद पोलिसांकडे, पोलिस एमएमआरडीए व नगर परिषद यांच्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे.
तपासून कारवाई करू
रस्त्याचे बांधकाम करणारे अभियंते तामसेकर यांनी १५ िदवसांपूर्वीच आपली बदली झाली असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघात त्यांच्या कार्यकाळात झाल्याचे लक्षात अाल्यावर त्यांनी विशाल इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले.
गुन्हा नोंदवणे योग्यच
प्रीतीवर गुन्हा नोंदवला आहे. तपासात एमएमआरडीए, कंत्राटदारांना बोलावले जाईल. तांत्रिक अहवाल मागवले जातील. त्यानंतर दोषींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलिस उपायुक्त वसंत जाधव यांनी सांगितले.
अपघाती खड्डा बुजवून नागरिकांचा निषेध
अंबरनाथ सिटिझन फोरमने अंबरनाथ नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यानिशी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चार महिन्यांपूर्वीच दिले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर काहीही कारवाई केली नाही. प्रीती प्रसादविरुद्ध गुन्हा नोंदविला जाताच संघटनेचे प्रमुख सत्यजित बर्मन यांनी गुरुवारी ज्या खड्ड्यांमुळे अपघात घडला तो खड्डा सामान्य काँक्रीटने बुजवून सरकार आणि प्रशासनाचा प्रतीकात्मक निषेध नोंदवला.
संबंधितावर कारवाईची मागणी करणार : या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबद्दल एमएमआरडीएकडे आम्ही तक्रार करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी करू. या प्रकरणाचा योग्य निकाल लागायला हवा, असे अंबरनाथच्या नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांनी सांगितले.