आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची टर उडवल्याने मलिष्कावर कारवाईचा घाट; मुंबईकरांचा पाठिंबा, शिवसेना बॅकफूटवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का’ या गाण्यातून आरजे मलिश्काने बृहन्मुंबई महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणला. त्या रागातून शिवसेनेची असलेल्या महापालिकेने मलिश्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या शोधून काढल्या. सूडबुद्धीने मलिश्काच्या कुटुंबीयांना नोटीस पाठवली. इतकेच नव्हे तर तिच्यावर ५०० काेटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठाेकण्याचा इशाराही दिला हाेता. मात्र, हा डाव महापालिकेवरच उलटला. या मुद्द्यावर विराेधी पक्षांनी मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला बुधवारी जाब विचारला. तसेच मुंबईकरांनी टिवट करत मलिश्काला पाठिंबा दिल्याने शिवसेना बॅकफूटवर गेली अाहे.  

आरजे मलिश्का मेन्डोसाचे दोन आठवड्यांपूर्वी ‘मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का’ गाणे व्हायरल झाले. अल्पावधीतच समाजमाध्यमांवर या गाण्याने धुमाकूळ घातला. त्याची दखल घेत शिवसेनेने मलिश्काची टिंगल करणारे एक गाणे रिलीज केले.  मलिश्काचे गाणे शिवसेनेला इतके झोंबले की खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली. ‘मुंबईत पाऊसच इतका पडतो, मग पालिकेची चूक काय?’ असे सांगत ठाकरे यांनी पालिकेचा बचाव केला. त्यानंतर शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेत एफएम रेडिओवर ५०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा, अशी मागणी केली. या प्रकारानंतर पालिका प्रशासनही जागे झाले. पाली हिल येथील मलिश्काच्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाने नोटीस पाठवली. का तर म्हणे मलिश्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. या नोटिसीचे पडसाद बुधवारी पालिकेत उमटले. भाजप, समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी या शिवसेनेच्या विरोधक पक्षांनी मलिश्कावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला.  

सर्व विराेधकांचा मलिश्काला पाठिंबा  
शिवसेनेच्या विराेधकांनी ही संधी साधत महापालिकेला लक्ष्य केले. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी टि्वट करत मलिश्काला पाठिंबा दिला. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मलिश्काचा आवाज पालिका दाबत आहे, असा आरोप केला. संभाजी ब्रिगेड, आप या पक्षसंघटनांनी मलिश्काला पाठिंबा दिला आहे. लाखो मुंबईकरांनी टि्वट करत मलिश्काला पाठिंबा दिला. या पाठिंब्याने मलिश्काही भारावली, तिने मुंबईकरांचे आभार व्यक्त केले. यापूर्वी सेलिब्रिटी, ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या, मग त्यांच्या नोटिसा प्रसार माध्यमांकडे का गेल्या नाहीत, असा सवाल शिवसेनेला विचारला जातो आहे. शिवसेनेने मलिश्काला टार्गेट करण्यापेक्षा शहरातील रस्ते सुधारून  पारदर्शी कारभार करावा, असा सल्ला शिवसेनेच्या नेतृत्वाखालील बृहन्मुंबई महापालिकेस सर्वपक्षीयांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...